देवा शप्पथ... मुली इतके घाणेरडे कपडे घालतात की शूर्पणखासारख्या दिसतात - कैलास विजयवर्गीय

Kailash Vijayvargiya : कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या कैलास विजयवर्गीय यांनी यावेळी मुलींच्या कपड्यांवरुन केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावर विजयवर्गीय यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 8, 2023, 02:35 PM IST
देवा शप्पथ... मुली इतके घाणेरडे कपडे घालतात की शूर्पणखासारख्या दिसतात -  कैलास विजयवर्गीय title=

Kailash Vijayvargiya : भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya Controversial Remark) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. कधी अग्निवीरची (agniveer) तुलना सुरक्षा रक्षकासोबत तर कधी भरपूर पोहे खाणारे बांग्लादेशी असल्याची वक्तव्ये कैलास विजयवर्गीय यांनी केली आहेत. त्यानंतर आता कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचा हनुमान जयंतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कैलाश विजयवर्गीय यांनी मुलींच्या कपड्यांवरुन भाष्य केले आहे. काही मुली असे कपडे घालून बाहेर पडतात की, त्यांना गाडीतून खाली उतरवून कानाखाली मारावी वाटते, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

मुली इतके घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की त्या शूर्पणखा सारख्या दिसतात. विजयवर्गीय यांच्या मते, देवीचे रूप आता मुलींमध्ये दिसत नाही. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा विरोधकांनी विजयवर्गीय यांना घेरले आहे.

काय म्हणाले कैलास विजयवर्गीय?

"आजही जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मला सुशिक्षित तरुण-तरुणी नशेत नाचताना दिसतात. असं वाटतं खाली उतरून पाच - सात कानाखाली ठेवून द्याव्यात म्हणजे त्यांची नशा उतरेल. मी खरचं सांगतो, देवाची शपथ. हनुमान जयंतीला मी खोटं बोलणार नाही. मुली घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात. आपण आपल्या स्त्रियांना देवी मानतो. पण त्यांच्यात देवीचे रूप दिसत नाही. एकदम शूर्पणखा दिसतात. खरच देवाने छान सुंदर शरीर दिलेले आहे. छान कपडे घाला यार. तुम्ही मुलांमध्ये संस्कार रुजवा. मला खूप काळजी वाटत आहे," असे कैलास विजयवर्गीय म्हणाले.

विजयवर्गीय यांनी बुधवारी रात्री महावीर जयंती आणि हनुमान जयंतीनिमित्त एका स्थानिक सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना हे विधान केले आहे. व्हिडिओमध्ये विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये रात्रीच्या वेळी तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नशेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. मी आजी-आजोबा, पालकांना सांगतो की, शिक्षणाची गरज नाही, संस्कार आवश्यक आहेत, असेही विजयवर्गीय म्हणाले.

अग्निवीर योजनेबाबत वादग्रस्त वक्तव्य

"अमेरिका, चीन आणि फ्रान्समध्ये लष्करात कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. आपल्याकडे सैन्यातून निवृत्तीचे वय जास्त आहे. ते कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जेव्हा अग्निवीर ही पदवी घेऊन सैन्यातून निवृत्त होईल आणि मला या भाजपा कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवायचा असेल, तर मी अग्निवीरलाच प्राधान्य देईन," असे कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले होते.

मुलींबाबत कैलाश विजयवर्गीय यांनी याआधीही वादग्रस्त विधान केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही त्यांनी असेच विधान केले होते.  'मी जेव्हा परदेशात जात होतो, तेव्हा कोणीतरी म्हटलं की तिथल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलतात. बिहारचा मुख्यमंत्रीही असाच आहे, कोणाचा हात धरतो आणि सोडतो ते कळत नाही, असे विजयवर्गीय म्हणाले होते.