मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा चमत्कार घडवेल; मतदानानंतर कमल नाथांचा दावा

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांसाठी बुधवारी ६५.५ टक्के इतके मतदान झाले.

Updated: Nov 28, 2018, 09:41 PM IST
मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा चमत्कार घडवेल; मतदानानंतर कमल नाथांचा दावा title=

भोपाळ: मध्य प्रदेशात बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर काँग्रेसकडून आम्ही मोठा चमत्कार घडवू, असा दावा करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भोपाळ येथील पत्रकार परिषदेत याबद्दल भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आजचे मतदान पाहता दोन गोष्टी शांतपणे निकालात निघाल्या आहेत. एक म्हणजे निवडणूक आणि दुसरे म्हणजे भाजप. यापूर्वी आम्ही विधानसभेच्या १४० जागा जिंकू, असे मी म्हटले होते. मात्र, आजचे मतदान पाहता मध्य प्रदेशात आणखी मोठा चमत्कार पाहायला मिळेल, असा दावा कमल नाथ यांनी केला. यावेळी त्यांनी काही मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणीही केली. ज्या मतदान केंद्रांवरील व्होटिंग मशिन्स तीन तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद होत्या, त्याठिकाणी पुन्हा मतदान घेतले जावे. कारण, यावेळेत आलेले लोक माघारी परतले. त्यापैकी काहीजण कामामुळे पुन्हा मतदान करण्यासाठी येऊ शकले नाहीत. आता निवडणूक आयोगाकडून या मतदान केंद्रं रात्री ९ ते १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली आहेत. मात्र, हा निर्णय योग्य नाही, असे कमलनाथ यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांसाठी बुधवारी ७४ टक्के इतके मतदान झाले. गेल्या १५ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसू शकतो. याचा लाभ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. २३० पैकी २२७ मतदारसंघात सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत मतदान पार पडले. तर उर्वरित तीन नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत मतदान पार पडले.