कार्यकर्त्याला कुत्र्याचं बिस्किट का दिलं? व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, म्हणाले 'तो फार...'

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेलं बिस्किट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेतील (Bharat Jodo Nyay Yatra) या व्हिडीओवरुन भाजपा त्यांच्यावर टीका करत आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2024, 04:24 PM IST
कार्यकर्त्याला कुत्र्याचं बिस्किट का दिलं? व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण, म्हणाले 'तो फार...' title=

Raul Gandhi Viral Video: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर एका व्हिडीओवरुन भाजपा निशाणा साधत आहे. भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी यांनी गाडीच्या छतावर बसलेले असताना एका कार्यकर्त्याला बिस्किट दिलं. दरम्यान त्यांनी आधी हे बिस्किट कुत्र्याला दिलं होतं. पण कुत्र्याने ते नाकारल्यानंतर त्यांनी ते समर्थकाच्या हातात सोपवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपा नेत्यांनी जोरदार टीका सुरु केली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रया दिली आहे. 

राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "यामध्ये समस्या काय आहे? जेव्हा श्वानाला माझ्याकडे आणण्यात आलं तेव्हा तो घाबरलेला होता. तो भीतीने थरथरत होता. जेव्हा त्याने बिस्किट खाल्लं नाही तेव्हा मी त्या व्यक्तीकडे दिलं आणि म्हटलं तुम्हीच भरवा. नंतर कुत्र्याने ते बिस्किट खाल्लं. भाजपा लोकांचा नेमका ध्यास काय आहे. कुत्र्याने त्यांचं काय बिघडवलं आहे?".

व्हिडीओत नेमकं काय?

भारत जोडो न्याय यात्रेने आपल्या एक्स अकाऊंवर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. झारखंमध्ये यात्रा पोहोचली असता तिथे लोकांनी गर्दी केली होती. राहुल गांधींसह गाडीच्या टपावर एक श्वान होता. राहुल गांधी यांनी या श्वानाला भरवण्यासाठी बिस्किटचा पुडा मागितला. यानंतर राहुल गांधी श्वानाला बिस्किट भरवत होते. दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांच्याशी बोलण्याचा, फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका समर्थकाशी बोलत असताना राहुल गांधी श्वानाला बिस्किट भरवत होते. पण श्वानाने खाण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींनी तेच बिस्कीट समर्थकाला दिलं. 

भाजपाची टीका

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावर टीका करताना भूतकाळातील घटनेचाही उल्लेख केला. एकेकाळी काँग्रेस नेते असणाऱ्या हेमंत बिस्वला सरमा यांनी राहुल गांधींवर टीका करताना ते आणि त्यांचं कुटुंब मला बिस्किट भरवू शकलं नाही असं म्हटलं आहे. "मी आसामचा एक अभिमानी नागरिक असून, मी ते बिस्किट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसमधून राजीनामा दिला," असं हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान पाळीव कुत्रा पिडीला प्लेटमधून बिस्किटे देण्यात आली होती, जी नंतर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांना देण्यात आली होती असाही दावा त्यांनी केला आहे.