धक्कादायक! वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; 17 वर्षीय आरोपी अटकेत

Chhattisgarh Crime News: पहाटे गावकऱ्यांना या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणामध्ये नंतर धक्कादायक खुलासा झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2024, 05:25 PM IST
धक्कादायक! वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; 17 वर्षीय आरोपी अटकेत title=
पोलिसांनी आरोपींना केली अटक (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - freepik डॉट कॉम)

Chhattisgarh News in Marathi: छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. एका 30 वर्षांच्या महिलेची हत्या करुन तिच्या पार्थिवाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेची हत्या करणारे दोन्ही आरोपी तिच्या नात्यातले आहेत.

एक आरोपी अल्पवयीन

छत्तीसगडमधील पारसगुडी येथील हरितमा गावामध्ये हा सारा प्रकार घडला आहे. सदर परिसर राजपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. या महिलेची हत्या 30 जानेवारी रोजी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. 

आरोपी हा मृत महिलेचा दीर

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी अल्पवयीन आरोपी हा मृत महिलेचा दीर आहे. हा आरोपी केवळ 17 वर्षांचा आहे. महिलेच्या पतीच्या भावाने त्यांच्याच नात्यातील व्यक्तीच्या मदतीने तिची हत्या केल्याच पोलिसांनी सांगितलं आहे. 

दोघेही गावाबाहेर राहत होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सुरगुंज जिल्ह्यातील अकोला येथे ही मृत महिला तिच्या पतीबरोबर स्थायिक झाली होती. कामानिमित्त हे दोघे पारसगुडीपासून काही किलोमीटरवर असलेल्या अंतरावर हे दोघे वेगळे राहण्यासाठी आले होते. ज्या दिवशी या महिलेची हत्या झाली त्या दिवशी आरोपींनी तिला फोन करुन मूळ गावी म्हणजेच हरितमा गावामध्ये बोलावलं होतं. शेतीची कामं असल्याने आज इकडे ये असं या महिलेला आरोपींनी सांगितलं आणि तिला बोलावून घेतलं."

त्या रात्री नेमकं काय घडलं?

त्याच रात्री या महिलेची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. "रात्री दोन्ही आरोपींनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने दारुच्या नशेत या महिलेचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळला आणि तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळून जाणाऱ्या गावकऱ्याला या महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला. तपास या दोन आरोपींपर्यंत येऊन थांबला असता त्यांनी गुन्हा कबूल केला. आम्हीच या महिलेची हत्या केली असून तिच्या मृतदेहबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचं दोघांनी त्यांच्या कबुलीमध्ये सांगितलं," अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध

या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सध्या पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये या दोन मद्यधुंद व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणाचा हात आहे का? या तिघांमध्ये रात्री कशावरुन काही वाद झाला होता का? अचानक आपल्याच वहिनीचा गळा आवळून अल्पवयीन मुलाने तिची हत्या का केली? सारं घडलं तेव्हा चौथी कोणीही व्यक्ती तिथं उपस्थित होती का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप सापडलेली नाहीत. पोलीस या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहेत.