सिद्धूचं पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र

करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात सामिल होण्यासाठी इम्रान खान यांचं नवज्योत सिंग सिद्धू यांना विशेष आमंत्रण

Updated: Nov 2, 2019, 06:18 PM IST
सिद्धूचं पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र title=
संग्रहित फोटो

अमृतसर : काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांनी (Navjot Singh Sidhu) परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पत्र लिहून पाकिस्तानात करतारपूर कॉरिडोरच्या (Kartarpur corridor) उद्धाटनाला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे. 

९ नोव्हेंबर रोजी इम्रान खान करतारपूर कॉरिडोरचं उद्धाटन करणार आहेत. करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात सामिल होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून, काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. 

यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने, सिद्धू यांना पाकिस्तानात जाण्यासाठी राजकीय मान्यता घ्यावी लागेल, असं स्पष्ट केलं होतं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे भारतातून करतारपूरला जाणाऱ्या ५७५ यात्रेकरुंपैकी एक आहेत. केंद्र सरकारने २९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या ५७५ यात्रेकरुंची यादी जाहीर केली आहे.

  

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यावेळीदेखील नवज्योत सिंग सिद्धू, इम्रान खान यांच्या आमंत्रणानंतर पाकिस्तानला गेले होते. नवज्योत यांचा हा पाकिस्तान दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला होता.