नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या स्पेशल कोर्टने माजी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं आहे.
मधु कोडा कोळसा घोटाळ्यामध्ये दोषी ठरले आहेत. गुरुवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. मधु कोडा हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. झारखंडचे माजी प्रमुख सचिव अशोक कुमार बसु आणि माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता आणि आणखी एका आरोपीला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.
झारखंडमधील राजहरा कोळसा खाणवाटपात कोलकात्याच्या विनी आयरन अँड स्टील उद्योग लिमिटेडला अवैधपणे टेंडर देण्यासाठी शिफारस केल्याचं हे प्रकरण आहे. सीबीआयने म्हटलं की, कंपनीने ८ जानेवारी २००७ पर्यंत राजहरा कोळसा खानवाटपासाठी अर्ज केला होता. सीबीआयने आरोप केला आहे की, 36 व्या स्क्रीनिंग कमिटीने या ब्लॅक लिस्टेड कंपनीला खाणवाटपात स्थान मिळावं म्हणून शिफारस केली होती.
सीबीआईने म्हटलं की, या समितीचे अध्यक्ष गुप्ता यांनी कोळसा मंत्रालयाचा अधिक भार असलेल्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून ही गोष्ट लपवली की, झारखंड सरकारने वीआयएसयूएलची कोळसा खाणवाटपासाठी शिफारस केली नव्हती. एजेंसीने म्हटलं की, कोडा, बसु आणि दोन आरोपी लोकसेवकांनी वीआयएसयूएलला कोळसा खाणवाटपात टेंडर मिळावं म्हणून योजना आखली होती. पण आरोपींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश भरत पराशर यांनी कोडा आणि इतर आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. गुरुवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमनुसार यामध्ये जन्मठेपाची उच्चतम शिक्षा आहे.