अयोध्या : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार आहेत. त्यापूर्वी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले आहेत.
5 ऑगस्ट रोजी भूमिपूजनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण जवळ येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने लोकांना घरी बसून ऐतिहासिक क्षण पाहण्याचे आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी अयोध्येत पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणेचा देखील आढावा घेतला. सीएम योगींनी सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनस्थळाव्यतिरिक्त हनुमानघाडी मंदिरालाही भेट दिली. त्यांनी 'अवधपुरी प्रभु आवत जानी, भई सकल सोभा कै खानी' असे ट्विटही केले.
मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, 'बर्याच शतकांची प्रतिक्षा आता संपली आहे. व्रताचं फल मिळत आहे. संकल्प सिद्ध होत आहे. सर्व भाविकांनी घरी दीप प्रज्वलित करावे. श्री रामचरितमानस वाचावे. सर्व लोकांना भगवान श्री राम यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.'
महत्त्वाचे म्हणजे 5 ऑगस्ट रोजी होणार्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्याच्या सीमा बंद केल्या जाणार आहेत. अयोध्येत प्रवेश बंदी असणार आहे. या सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे, मोठ्या संख्येने लोकांना येण्याची परवानगी नाही, भूमिपूजनाच्या वेळी दोनशेपेक्षा कमी पाहुणे उपस्थित राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत सुमारे दोन ते तीन तास राहतील. यावेळी सामाजिक अंतराचं पालन केलं जाईल. कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील. ट्रस्टशी संबंधित लोकं, राम मंदिर चळवळीशी संबंधित लोकं आणि इतर पाहुण्यांना मुहूर्तावर बोलावले जाणार आहे.
आजपासून लोकांना आमंत्रण पत्र पाठवले गेले आहेय. सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद पक्षाचे समर्थक असलेले इक्बाल अन्सारी यांनाही आमंत्रित केले गेले आहे.