काश्मिरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने तब्बल 4 वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला आहे. तरीही पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच. चीनसमोर लाळघोटेपणा करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची कळ काढण्याची तयारी केलीय.
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट बाल्टीस्तानला लागून असलेला हुंझा व्हॅली हा प्रदेश पाकिस्तान चीनच्या घशात घालण्याची शक्यता आहे. पाकिस्तान चीनच्या कर्जात बुडालाय. या कर्जाची परतफेड करणं पाकिस्तानला अशक्य आहे. त्यामुळे हुंझा व्हॅली चीनला आंदण देण्याचा घाट पाकिस्तानने घातलाय.
हुंझा व्हॅलीचा भाग युरेनियमने समृद्ध आहे. अतिशय डोंगराळ असा हा प्रदेश निसर्गसंपन्नही आहे. हा भाग चीनच्या घशात गेला तर चीन इथली खनिज संपत्ती ओरबाडणार. त्याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचा तळ आणखी भक्कम होणार.
चीननं यापूर्वीच भारताचा अक्साई चीन हा 1962 च्या युद्धात बळकावला. तर पाकिस्तानने 1963 मध्ये पाकव्याप्त काश्मिरातली शक्सगाम व्हॅली चीनच्या घशात घातली. आता त्याहूनही मोठा म्हणजे तब्बल 11 हजार 660 स्क्वेअर किलोमीटरची हुंझा व्हॅलीही चीनच्या ताब्यात गेली तर लडाख, सियाचीन, काश्मीरभोवती चीनचा विळखा मजबूत होणार आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा लौकीकार्थाने भारताचा प्रदेश आहे. हा भाग अवैधरित्या पाकिस्तानने 1947 पासूनच बळकावलाय. CPEC म्हणजे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनने इथे घुसखोरी केलीय. मात्र पाकिस्तानच्या या चिनी धार्जिण्या धोरणाला गिलगीट बाल्टीस्तानमधून तीव्र विरोध होतोय.
स्थानिकांनी पाकिस्तानी आर्मीवर, प्रशासकीय इमारतींवर दगडफेक केलीय. आता भारतानंही काही राजनैतिक पावलं उचलण्याची गरज आहे.