गरम इस्त्रीचे चटके, लाल मिरचीचा धूर अन् उलटं लटकवून....; अनाथाश्रमालयातच 21 मुलांवर क्रूर अत्याचार

बालकल्याण समितीच्या पथकाने अनाथाश्रमालयाला अचानक भेट देत पाहणी केली असता यावेळी हे अत्याचार उघड झाले.   

शिवराज यादव | Updated: Jan 19, 2024, 04:21 PM IST
गरम इस्त्रीचे चटके, लाल मिरचीचा धूर अन् उलटं लटकवून....; अनाथाश्रमालयातच 21 मुलांवर क्रूर अत्याचार title=

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अनाथ मुलांवर क्रूर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांनी डोक्यावर छप्पर दिलं त्या अनाथाश्रमालयाच्या कर्मचाऱ्यांनीच मुलांवर अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाल कल्याण समिती (CWC) च्या पथकाने गेल्या आठवड्यात अनाथाश्रमाची अचानक तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी छोट्या छोट्या चुकांसाठी मुलांवर क्रूर अत्याचार करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलांनी पथकाला सांगितलं की, त्यांना उलटं लटकवलं जातं. तसंच गरम इस्त्रीने चटके दिले जातात. याशिवाय नग्न केल्यानंतर फोटो काढण्यात आले". इतकंच नाही तर लाल मिरच्यांचा धूरही दिला जात असल्याचं मुलांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी अनाथाश्रमालयातील 5 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच तपास सुरु आहे. एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, "4 वर्षाच्या मुलाने पँटमध्येच शौच केल्यानंतर त्याला बाथरुममध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्याला दोन ते तीन दिवस अन्नच देण्यात आलं नाही".

पोलिसांनी सांगितलं आहे की, हे अनाथाश्रमालय वास्तल्यपूरम जैन ट्रसच्या माध्यमातून चालवलं जातं. हे अनाथाश्रमालय बाल न्याय कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेलं नाही. या ट्रस्टचे बंगळुरु, सूरत, जोधपूर आणि कोलकाता येथेही अनाथाश्रमालयात आहेत. 

"सीईसीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. अनाथाश्रम तात्काळ सील करण्यात आले आणि मुलांना सरकारी सुविधांमध्ये हलवण्यात आले," असे इंदूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अमरेंद्र सिंग यांनी सांगितले.

बालकल्याण समितीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. हे अनाथाश्रमालय तात्काळ सील करण्यात  आलं असून, मुलांना सरकारी सुविधांमध्ये हलवण्यात आलं आहे अशी माहिती इंदूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अमरेंद्र सिंग यांनी दिला आहे. या धक्कादायक आरोपांची चौकशी केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

पोलिसांनी सांगितलं आहे की, पथकाने मुलांचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मुलांच्या शरिरावर जखमा दिसत आहेत. ही अनाथ मुलं महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आहे.