जपून जपून जा रे पुढे खड्डा आहे... चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने पार केला मोठा अडथळा

पृथ्वी प्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागावर देखील अनेक खड्डे आहेत.  प्रज्ञान रोव्हर चंद्रावर भ्रमण करत असताना मोठा खड्डा त्याने ओलांडला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 28, 2023, 05:41 PM IST
जपून जपून जा रे पुढे खड्डा आहे... चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने पार केला मोठा अडथळा title=

Chandryan-3 Mission Update:  चांद्रयान 3 मोहिम आता प्रयोगशील टप्प्यात आली आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग नंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक संशोधन करत आहेत. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रण करत आहे. यावेळी प्रज्ञान रोव्हरने वाटेत आलेला मोठा अडथळा पार केला आहे. इस्रोने ट्विट करत या अडथळ्याविषयी माहिती दिली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करत आहे. चंद्रावर भूकंप होतात का, याचाही अभ्यास लँडर आणि रोवर करत आहेत

चंद्रावर खड्डे

प्रज्ञान रोव्हरच्या वाटेत आलेला अडथळा म्हणजे खड्डा आहे. पृथ्वी प्रमाणे चंद्रावर देखील मोठे खड्डे आहेत. चंद्रावर मून वॉक करत असताना प्रज्ञान रोव्हरच्या वाटेत मोठा खड्डा आला. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर भ्रमण करत असताना रोव्हरपासून 3 मीटर अंतरावर 4 मीटर व्यासाचा खड्डा आला. हा खड्डा ओलांडून प्रज्ञान रोव्हर सुरक्षितपणे पुढे गेला असल्याची माहिती इस्रोने ट्विट करत दिली आहे.

असा पार केला खड्डा

प्नज्ञान रोव्हरच्या वाटेत एक मोठा खड्डा आला होता. त्यानंतर प्रज्ञानने आपला मार्ग बदललाय. हा खड्डा जवळपास 4 मीटर व्यासाचा होता. इस्रोनं याचे नवे फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिलीय. खड्ड्यामुळे मोहिमेत कोणताही अडथळा आलेला नाही मोहीम सुरळीत सुरू असल्याचं इस्नोनं म्हंटल आहे. 

चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान किती?

चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान किती असतं.. याचं कोडं तुम्हाला पडलं असेल तर त्याचं उत्तर चांद्रयानने दिले आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण पाठवलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवतीच्या मातीचं तापमान प्रोफाइलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे. मात्र, जसं पृष्ठभागापासून खोलवर जातो तसा तापमानात बदल होतो. चंद्राच्या पृष्ठभागाच्या 8 सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे 10 अंश सेल्सिअस आहे.