Viral News : तुम्ही (Job) नोकरीच्या ठिकाणी दिवसातून किती तास वेळ देता? इथं तुम्ही किती तासांची नोकरी करता असा प्रश्न अपेक्षित होता पण, सध्या अमुक इतक्याच तासांची नोकरी ही संकल्पनाच आता विरताना दिसत आहे. कारण, एकदा कामाचा दिवस सुरु झाला की तो संपण्याची काहीच वेळ नसते. कागदोपत्री असणारी 8 ते 9 तासांची शिफ्ट नाही म्हणता 10 ते 12 तासांवर जाते. बरेचजण याहूनही जास्त वेळ ऑफिसमध्येच असतात. (CEO Slammed For sharing Hustle Culture Praises Worker Asleep In Auto)
कामाचा सतत वाढणारा बोजा आणि त्यामुळं येणारा ताण या साऱ्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम ही भीषण परिस्थिती सध्याची तरुणाई झेलत आहे. नाईलाजानं काही गरजा भागवण्यासाठी आणि अर्थार्जनासाठी त्यांना नोकरीवर टिकून राहावंच लागत आहे. परिस्थिती नेमकी किती भीषण आहे हेच यातून लक्षात येत आहे. कर्मचाऱ्यांची हीच अवस्था सोशल मीडियावरून सर्वांच्या पुढे आणणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याला सध्या नेटकऱ्यांनी झापलं आहे.
हे बडे अधिकारी म्हणजे Bombay Shaving Company चे सीईओ, शांतनू देशपांडे. हो... हे तेच देशपांडे आहेत ज्यांनी नव्या पिढीकडून तब्बल 18 तास काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले देशपांडे यावेळीसुद्धा अनेकांच्याच बोचऱ्या टिकेला सामोरे जाताना दिसत आहेत.
आपल्याच कंपनीतील एका सेल्स हेडचा फोटो त्यांनी पोस्ट केला. त्यानं केलेल्या कामाचंही कौतुक केलं. एक कर्मचारी म्हणून तो बजावत असणारी भूमिका आणि इतरांप्रती असणाऱी त्याची आदर्श प्रतिमा हे सर्वकाही त्यांन पोस्टच्या माध्यमातून मांडलं. असे कर्मचारी म्हणजे लाखात एक असणारं रत्नच असतात असा सूरही त्यांनी आळवला. पण, नेटकऱ्यांना मात्र त्यांचा हा सूर रुचला नाही.
एखादा कर्मचाऱी काम करतोय म्हणून त्याचीच सातत्यानं पिळवणूक करणं, स्वार्थापोटी त्यांच्या आरोग्याचाही विचार न करणं या वृत्तीला अनेकांनीच धारेवर धरलं. एका सीईओला ही अशी भूमिकाच शोभत नाही, असं म्हणत अनेकांनीच त्यांच्यावर ताशेरे ओढले. तुम्ही या अशा कामाच्या पद्धतीला प्रोत्साहन देताय जिथं कर्मचाऱ्यांच्या हिताचा कमी आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या फायद्याचाच विचार जास्त केला जातो असं म्हणत त्यांना काहीजणांनी चूकाही दाखवून दिल्या.
Bombay slaving company is back!
Other Employee: Should we wake him up/get him to a comfortable bed?
Founder: Nah, Let me get a picture for personal brand building. Im glad he isn't in an Uber or picture won't have that impact. pic.twitter.com/ksOaAGZjOo
— Garv Malik (@malikgarv) February 17, 2023
एक कर्मचारी प्रवासादरम्यानच झोपतो... ही परिस्थितीच किती वाईट आहे. तुम्ही आता माणसांना निवांत झोपूही देणार नाही का? आणखी कामाचा बोजा किती वाढवणार या आणि अशा असंख्य प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर करण्यात आला. एक कर्मचारी म्हणून नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळणारा पगार आणि त्यानंतर आपल्याकडून केली जाणारी कामाची अपेक्षा यामध्ये असणाऱ्या तफावतीचा तुम्ही विचार केलाय का? तुम्हाला पुढे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाल्यास खरंच तुम्हाला असं नेतृत्त्वं करायचंय का? विचार करा...