नवी दिल्ली : कोरोना corona व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारकडूनही दक्षतेची पावलं उचलण्यात येत आहेत. ज्याअंतर्गत आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पद्म पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याची तारीख तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. ३ एप्रिलला राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा पार पडणार होता. पण, कोरोनाची दहशत पाहता आता पुरस्कार सोहळ्याची तारीख पुढे ढकलली आहे.
पद्म पुरस्कार सोहळ्याची नवी तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलं गेलं आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसविषयी आता राज्यशासनही सतर्क झाले आहेत.
दरम्यान, यंदाच्या वर्षी एकूण १४१ पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये सात पद्मविभूषण, १६ पद्म भूषण आणि ११८ पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश आहे. या यादीत ३३ महिला पुरस्कार्थींचाही समावेश आहे. शिवाय परदेशी विभाग, एनआरआय, पीआयओ, ओसीआय अशा एकूण १८ आणि १२ मरणोत्तर पुरस्कार्थींचाही समावेश आहे.
वाचा : 'माझ्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेह घरातच पडलाय'
जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि उडपी मठाचे Vishveshateertha Swamiji Sri Pejavara Adhokhaja यांना मरणोत्तर पद्म विभूषण देण्यात येणार आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक गणल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कला, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यवसाय- उद्योग, वैद्यकिय क्षेत्र, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं.