Sameer Wankhede Bribery Case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
कथित खंडणी प्रकरणातील अनेकांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र आता खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख वेळ निश्चित नाही असं समजत आहे.
"आम्ही लवकरच एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवणार आहोत. याशिवाय आरोपी किरण गोसावी आणि डिसूजा यांनी वानखेडेंच्या वतीने 25 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी शाहरुख खानचाही जबाब नोंदवणार आहोत. जर कटाच्या मुळापर्यंत जायचं असेल तर जबाब नोंदवणं आवश्यक आहे," असं एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
गेल्या महिन्यात सीबीआयने समीर वानखेडे कथित लाच प्रकरणाची थोडक्यात चौकशी केली होती. या प्रकरणात वानखेडेंची सविस्तर चौकशी करण्यासाठी सीबीआय कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहे.
हे संपूर्ण प्रकरण ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईत घडलेल्या क्रूझ शिप रेडशी संबंधित आहे. या रेडमध्ये काही हायप्रोफाईल व्यक्तींसह अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खानकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याचे आरोप होते. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व NCB चे तत्कालीन झोनल प्रमुख समीर वानखेडे यांनी केले होते.
आर्यनवर ड्रग्ज तस्कर आणि आंतरराष्ट्रीय समूहांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु, 25 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मिळाला होता. यानंतरच आर्यन खानला मुद्दाम टार्गेट करून लाच मागण्यात आली असे आरोप करण्यात आले होते. समीर वानखेडे यांनीच कथितरित्या शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितली असा दावा करण्यात आला. त्याचाच सीबीआयकडून सध्या तपास सुरू आहे.
सीबीआयने 11 मे रोजी वानखेडे, एनसीबीचे माजी पोलीस अधीक्षक विश्व विजय सिंह, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन आणि गोसावी आणि डिसोझा यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला होता. एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष चौकशी पथकाने आरोप केला होता की, खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचण्यात आला होता. आणि ही रक्कम नंतर 18 कोटींवर आणण्यात आली होती. गोसावीने 50 लाखांची टोकन रक्कम घेतली होती. परंतु या रकमेचा काही भाग नंतर परत करण्यात आला.