गुजरात निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी

गुजरात विधानसभेच्या निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी आता स्पष्ट झाली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 18, 2017, 09:22 PM IST
गुजरात निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी  title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणूक निकालाची अंतिम आकडेवारी आता स्पष्ट झाली आहे. १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजप ९९ जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. याचबरोबर भाजपनं बहुमताचा ९२ जागांचा आकडाही पार केला आहे.

गुजरात म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा गड. पण याठिकाणी काँग्रेसनंही जोरदार टक्कर दिली. काँग्रेसनं गुजरातमध्ये ८० जागा जिंकल्या आहेत. तर ३ ठिकाणी इतर उमेदवार निवडून आले आहेत.

इतिहासातील पहिली वेळ

गुजरातमध्ये भाजपने विजयाचा षटकार लगावला आहे. यापूर्वी भाजपने सलग पाच वेळा गुजरात विधानसभा निवडणुकीत बहूमत मिळवलं होतं. त्यानंतर आता सहाव्यांदा बहूमत मिळवत सत्ता स्थापन करण्यात येणार आहे.

विजयाची घोडदौड कायम

भाजपने १९९५ साली पहिल्यांदा गुजरात विधानसभेत विजय मिळवला. त्यानंतर आपली विजयाची घौडदौड कायम राखली आहे. सहावी टर्म पूर्ण केल्यास भाजप सलग २७ वर्ष सत्ता स्थापन करेल. सलग २७ वर्ष सत्ता एका पक्षाच्या हातात येण्याची इतिहासातील पहिली वेळ ठरणार आहे.

'देशाला विकास हवाय'

जनतेने दिलेला कौल हा विकासाला दिलेला कौल आहे’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘जीएसटी लागू केल्यावर विरोधक भाजपच्या पराभवाबाबत बोलत होते. पण विधानसभा निवडणुकीत मिळालेला हा विजय दर्शवतो की, जनतेला विकास हवा आहे. बदला घेण्यासाठी मोठी तयारी केली जात होती, पण गुजरात आणि हिमाचलच्या जनतेने कॉंग्रेसच्या आशांवर पाणी फेरलं आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कुशलतेची प्रशंसा केली. अमित शाह यांची कुशल रणनितीने कॉंग्रेसला मात दिली आहे. तसेच विरोधकांवर हल्लाबोल करत ते म्हणाले की, ‘भाजप तुम्हाला पसंत असो वा नसो, पण देशाच्या विकासाचा ट्रॅक डिरेल करू नका. आज जागतिक स्पर्धेच्या युगात भारताला पुढे जायचे आहे तर भारताला विकासाच्या नव्या उंची गाठाव्या लागतील.