'कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ड्रग्ज आणि बेटिंगच्या पैशाचा वापर'

कन्नड चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफियांच्या संबंधांचा मुद्दा सध्या गाजत आहे.

Updated: Aug 31, 2020, 11:35 PM IST
'कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून  ड्रग्ज आणि बेटिंगच्या पैशाचा  वापर' title=

बंगळुरू: कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून अंमली पदार्थ, सट्टेबाजी आणि अवैध मार्गाने आलेल्या पैशाचा वापर करण्यात आला होता, असा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला. ते सोमवारी तुरूवेकरे येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

सध्या कन्नड चित्रपट क्षेत्र आणि ड्रग्ज माफियांच्या संबंधांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याविषयी कुमारस्वामी यांना पत्रकारपरिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा कुमारस्वामी यांनी म्हटले की, मी मुख्यमंत्रीपदावर असताना अनेक ड्रग्ज माफिया कारवाईच्या भीतीने श्रीलंकेत पळून गेले. कर्नाटकातील आमचे सरकार अस्थिर होण्यासाठी हेच ड्रग्ज माफिया जबाबदार होते. ड्रग्ज माफिया आणि क्रिकेट सट्टेबाजीतून आलेल्या पैशाच्या जोरावरच भाजपने कर्नाटकातील जनता दलाचे (सेक्युलर) पाडले, असा थेट आरोप कुमारस्वामी यांनी केला.

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या आघाडीच्या अभिनेत्याने मला धमकावलं- कंगना

काही दिवसांपूर्वीच चित्रपट दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश यांच्या एका विधानामुळे कन्नड चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफियांच्या संबंधांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी कर्नाटकातील केंद्रीय गुन्हे शाखेकडून CCB इंद्रजीत लंकेश यांची चौकशीही करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफिया यांच्यातील संबंधांची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे आता कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे.