चंदिगढ: भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सध्या देशभरात पराक्रम पर्व साजरे केले जात आहे. अशातच भाजपचे केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हरियाणा येथील एका जाहीर सभेत त्यांनी शहीद सैनिकांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शहीद सैनिकांच्या वीरपत्नींच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीरेंद्र सिंह यांनी म्हटले की, मी मुख्यमंत्र्यांना सांगून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी नुकसान भरपाई वाढवण्याचा प्रयत्न करेन. कारण, असेही हरियाणाचा एखादाच सैनिक सीमारेषेवर मारला जातो.
बीरेंद्र सिंह यांच्या या विधानाविषयी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे सरकारकडून तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आव्हान केले जाते. दुसरीकडे सरकारमधील मंत्री अशाप्रकारची वादग्रस्त विधाने करतात. अशा मंत्र्यांनी स्वत:ची मुले सैन्यात पाठवावीत, म्हणजे त्यांना हौतात्म्याची किंमत कळेल. बीरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या अनेक कुटुंबीयांनी भविष्यात कोणत्याही सरकारी कार्यक्रमात सामील होणार नसल्याचे सांगितले.