बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला

Bihar Politics : बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीने विश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे जेडीयू भाजप सरकार कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत त्यांच्या सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

Updated: Feb 13, 2024, 12:45 PM IST
बिहारचं सरकार वाचवण्यात विनोद तावडेंची मोठी भूमिका; लालूंचा डाव त्यांच्यावरच उलटवला title=

Bihar Politics : बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विश्वासदर्शक ठराव आधी आवाजी मतदानाने आणि नंतर 129 आमदारांच्या पाठिंब्याने मतदानाद्वारे मंजूर करण्यात आला. मतदानापूर्वी नितीश यांच्या भाषणादरम्यान विरोधी सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. सरकारला 128 आमदारांचा पाठिंबा होता पण त्याला 129 मते मिळाली. तर आरजेडीचे तीन आमदार चेतन आनंद, प्रल्हाद यादव आणि नीलम देवी नितीश यांच्या समर्थनार्थ गेले होते. महत्त्वाचं म्हणजे आरजेडीचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर झालेल्या मतदानादरम्यान केवळ 125 आमदार सरकारच्या पाठीशी उभे होते. सरकारच्या अविश्वास ठरावावर मतदान होईपर्यंत ही संख्या 129 वर पोहोचली होती.

त्यानंतर बिहार विधानसभेत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय प्रथम आवाजी मतदानाने घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विनंतीवरून मतदान घेण्यात आले आणि विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 129 मते पडली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही. बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. मात्र सरकारकडे ऐनवेळी संख्याबळ नसल्याने अडचण निर्माण झाली होती. त्याचवेळी महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याने हालचाली करत विरोधकांवर त्यांचा डाव उलटा पाडला.

लालूंचा खेला उलटाच पडला

नितीश कुमार आणि भाजपचं सरकार झाल्यावर त्यांचे १२८ आमदार होते. आरजेडी, कााँग्रेस आणि अन्य पक्षाचे ११५ आमदार होते. नितीश कुमार यांचा शपथ विधी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यासाठी विधी मंडळाचे अधिवेशन १४ दिवस पुढे ढकलण्यात आले. सरकारकडे बहुमत असल्यामुळे जदय आणि भाजपचे नेते सावध राहिले नाहीत आणि त्याचवेळी सरकार गेल्यामुळे लाल आणि चिरंजीव तेजस्वी यांनी खेला करण्याची घोषणा केली. सरकार विजयी झाले पण सरकार टिकणार नाही अशी घोषणा लालू यांनी केली आणि या कालावधीत लालू यांनी ५ जदयू आणि भाजपचे ३ आमदार गळाला लावले. त्यामुळे विनाधसभा अध्यक्ष्यांच्या विरोधात प्रस्ताव व्हायला जी १२२ मत हवी होती ती मिळवणे भाजपा आणि जदय ला अवघड झालं असतं आणि सरकार पराभूत झालं असतं.

ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हातात घेतली. ३६ तासांमध्ये जदयूचे ३ आमदार परत मिळवले आणि राजदचे ३ फोडण्यात यश मिळवलं. आज बिहार विधानसभेत अध्यक्षांविरोधात हा प्रस्ताव १२५ विरुद्ध ११२ मतांनी पारित झाला आणि उरलेले भाजपचे ३ आणि जदयचा १ असे ४ आमदार नितीश सरकारचा विश्वास दर्शक प्रस्ताव येण्यापूर्वी सभागृहात उपस्थित केले. त्यामुळे १२९ मतांनी नितीश सरकारचा प्रस्ताव पारित झाला. 

११ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ४-५ वाजेपर्यंत लालू यादवांच्या बाजूने होती. पण त्यानंतर अशा काही राजकीय घडामोडी घडवण्यात आल्या ज्यात आज सरकारचा विश्वासदर्शक ठराव पारित झाला. जदयचे आमदार परत आणण्यासाठी भाजपने महत्त्वाची भूमिका बजावली आणि राजदचे तीन आमदार फोडण्यात यश मिळवलं.