बिहार : नितीश कुमार सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन

बिहार राज्यातील नितीश कुमार यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन झाले आहे. 

Updated: Oct 16, 2020, 11:49 AM IST
बिहार : नितीश कुमार सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन  title=

मुंबई : बिहार राज्यातील नितीश कुमार यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे कोरोनाने निधन झाले आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर दोन मंत्री गमवावे लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी मंत्री विनोद सिंह यांचे दिल्लीत कोरोनाने निधन झाले होते. ते भाजपचे आमदार होते. सध्या बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. प्रचारालाही वेग आला आहे. त्यातच दोन मंत्र्यांचे निधन झाल्याने नितीश कुमार सरकारला हा मोठा धक्का आहे.

जनता दलचे (युनायटेड) ज्येष्ठ नेते आणि बिहार पंचायती राजमंत्री कपिल देव कामत यांचे शुक्रवारी कोरोनव्हायरस संसर्गाने निधन झाले. ते ६९ वर्षांचा होते. त्यांना पाटणा येथे अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) येथे दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.

ते चांगले नेते होते. त्यांचा पक्षाला मोठा आधार होता. ते एक कुशल प्रशासक आणि लोकप्रिय राजकारणी होते. त्यांच्या मृत्यूने मला व्यक्तिशः दु: ख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली.

कपिल देव कामत हे दहा वर्षे मंत्री होते. जनता दलमधून ते गेली ४० वर्ष राजकारणात सक्रीय होते. दरम्यान, बिहारमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. येथे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दोन लाखांच्यावर पोहोचला आहे.