हैदराबाद : तेलंगणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आलेल्या पुरामुळे ५० जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी ११ लोकांचा मृत्यू एकट्या हैदराबादमध्ये झाला आहे, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारकडून ही माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
तसेच पावसामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ज्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, त्यांना नवीन घर दिले जाईल. जर घराचे अर्धवट नुकसान झाले असेल तर दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंगळवारपासून राज्यात मुसळधार पावसामुळे हैदराबाद आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने १३५० कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. ग्रेटर हैदराबादसाठी ७५० कोटी आणि इतर भागात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केसीआरने शेतकऱ्यांसाठी ६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ६७,८६४ हेक्टरपेक्षा जास्त पिके नष्ट झाली आहेत. या संदर्भात आठ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. विशाखापट्टणममधील ५४३५ हेक्टर, पूर्व गोदावरीमध्ये २९३६२ हेक्टर, पश्चिम गोदावरीमध्ये १५,९२६, कृष्णामध्ये१२४६६, गुंटूरमध्ये ३८१, वायएसआर कडपामध्ये २०५३ कुरनूलमध्ये २४९ आणि श्रीकाकुलममधील १९९२ हेक्टर पिके नष्ट झाली आहेत.
नुकसान झालेल्या पिकांमध्ये धान, ऊस, मका, नाचणी, कापूस, तंबाखू इत्यादींचा समावेश आहे. ६२२९ हेक्टरमध्ये बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे, त्यात भाजीपाला, केळी, पपई, हळद, ऊस इ. बहुतेक ठिकाणी शेतांता पुराचे पाणी घुसले. त्यामुळे पिकांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. राज्यातील ९०० किमीचे रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत.