LTTE Leader Prabhakaran Alive: लिट्टेचा (LTTE) प्रमूख प्रभाकरण (Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तमिल्सचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी हा दावा केला आहे. 2009 श्रीलंकन सेनेने केलेल्या कारवाईत प्रभाकरणचा मृत्यू झाला होता. पण या कारवाईत तामिळ नॅशनल लीडर प्रभाकरणचा मृत्यू झालाच नाही, तो जिंवत असल्याचं नेदुमारन (P Nedumaran) यांनी म्हटलं आहे. प्रभाकरण याच्या कुटुंबियांच्या सहमतीने हा दावा करत असल्याचं नेदुमारन यांनी म्हटलंय.
श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) नेता व्ही. प्रभाकरन (V. Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. प्रभाकरण जिवंत आहे आणि त्याची प्रकृतीही चांगली आहे, लवकरच तो सर्वांसमोर येईल आणि तामिळ नागरिकांच्या चांगल्या आयुष्यासाठी नव्या योजनांची घोषणा करेल, असं पी नेदुमारन यांनी सांगितलं.
तामिळनाडूमधील तंजावरजवळील विलार इथं मुल्लिवाइक्कल मेमोरिअलमध्ये एका कार्यक्रमात पी नेदुमारन यांनी सांगितलं, सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती आणि श्रीलंकेतलं राजपक्षे शासनाविरोधात सिंहली लोकांचा विद्रोह पाहता प्रभाकरण सर्वांसमोर येण्याची योग्य वेळ आहे. जगभरातील तामिळ नागरिकांना प्रभाकरण यांना पूर्ण समर्थन देण्यासाठी एकजुट होण्याचं आवाहनही पी नेदुमारन यांनी केलं. इतंकच नाही तर तामिळनाडू सरकार, राजकीय पक्ष आणि तामिळनाडूच्या जनतेने प्रभाकरणबरोबर उभं राहण्याचंही आवाहन केलं आहे.
आपण प्रभाकरण याच्या कुटुंबियांच्या संपर्कात होतो, त्यांनीच प्रभाकरण प्रकृती ठिक असल्याची माहिती दिली. शिवाय ही माहिती बाहेर देण्यास लिट्टेने परवानगी दिल्याचं पी नेदुमारन यांनी सांगितलं. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर इथं झालेल्या भीषण हत्येत प्रभाकरण याचा सहभाग होता.