'...म्हणून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल'; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 31, 2023, 05:18 PM IST
'...म्हणून बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल'; अयोध्येतील महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका title=
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

Ayodhya Ram Mandir Balasaheb Thackeray Mahant Reacts: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरेंना 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राममंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित न करण्यात आल्याचा मुद्दा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गाजतोय. असं असतानाच आता अयोध्येतील महंतांनीच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असेल असा टोला महतांनी लगावला आहे. यामागील कारणही त्यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

अयोध्येतील महंतांना महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे की नाही या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न हनुमान गढीचे मंहत राजूदास महाराज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना महंत राजूदास यांनी आपण सनातनींविरोधात बोलताना फार स्पष्ट बोलतो असं सांगताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केला.

मी बोललो की वाईट होतो

"आम्ही सनातनी आहोत. आमचा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः वर विश्वास आहे. विश्व हिंदूंत्वाचा भाव आमच्या मनात असून आम्ही वसुधैव कुटुंबकम या हेतूने काम करतो. आम्ही आतापर्यंत कधी कोणाचा अपमान केला नाही. जे सनातन धर्माच्या विरोधात बोलतात त्यांच्याविरोधात मी बोललो की मी वाईट होतो. याचं मला थोडं वाईट वाटतं," असं महंत राजूदास म्हणाले.

बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल

पुढे बोलताना राजूदास यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला. "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असेल. मला रामविद्रोहींबरोबर सरकार बनवावं लागलं तर अशा राजकारणाला तिलांजली देईन, पक्षाला उद्धवस्त करेन, नष्ट करेन, अशी त्यांची भूमिका होती. दुर्देव आहे की त्यांचे पुत्र सोनिया गांधींच्या चरणांमध्ये पडले, त्यामुळेच त्यांचा आत्मा रडत असेल," असा टोला महंत राजूदास यांनी लगावला.

भाजपा विरुद्ध ठाकरे गट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यावरुन उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं रंगली आहे. अगदी स्वत: उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊत यांनीही भाजपावर या विषयावर मागील काही दिवसांपासून सातत्याने टीका केली आहे. तर भारतीय जनता पार्टीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करताना या निमंत्रण मुद्द्यावरुन पक्षाची बाजू मांडली आहे. अशातच आता थेट अयोध्येमधून महंतांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.