नवी दिल्ली - रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, हा निकाल येत्या एक-दीड महिन्यात लागला तर त्याचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीवरही होऊ शकतो. या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वखालील घटनापीठामध्ये त्यावर सुनावणी होईल. या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमण, न्या. उदय यू. ललित आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे. या खटल्याची रोजच्या रोज सुनावणी होईल की पुढील तारीख देण्यात येईल, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निकालात अयोध्येतील विवादित २.७७ एकर जमीन रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यामध्ये समप्रमाणात विभागण्याचे आदेश दिले होते. ३० सप्टेंबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक मताने हा निकाल दिला होता. त्यानंतर या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत घटनास्थळी जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी जलदगतीने सुनावणी घेण्याची काही याचिकाकर्त्यांनी मागणी गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्याचबरोबर २०१९ मध्ये या प्रकरणी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. गेल्यावेळी झालेल्या सुनावणीवेळी निकाल देण्यासाठी घटनापीठाची निर्मिती करण्यात आली आणि १० जानेवारीला सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत वटहुकूम काढला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी नेमलेल्या घटनापीठामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सर्व ज्येष्ठ न्यायमूर्तींचा समावेश आहे.