World News : लोकसंख्यावाढ ही साऱ्या जगापुढं उभी असणारी मोठी समस्या असतानाच काही देशांनी मात्र लोकसंख्या वाढीसाठी काही नवे उपक्रम राबवत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. चीन आणि जपानमागोमाग आता या यादीत रशियाचाही समावेश झाला असून, पुतीन यांच्या देशात घटता जन्मदर नियंत्रणात आणण्यासाठी एक नवी योजना लागू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत.
रशियातील एका क्षेत्रामध्ये सध्या 25 वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या विद्यार्थिनींना सुदृढ बालक जन्माला घालण्याच्या बदल्यात 1,00,000 रूबल (साधारण 81,000 रुपये) दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. रशियाच्या करेलिया क्षेत्रामध्ये ही योजना लागू करण्यात आली असून, इथं तरुणींना सरकारकडून कुटुंबवाढीसाठी प्रोत्साहित केलं जात आहे.
सरसकट सर्व महिलांना या योजनेत सहभागी होता येणार नसून, त्यासाठीही काही अटींची पूर्तता केली जाणं अपेक्षित आहे. या अटींनुसार या महिला/ तरुणी स्थानिक विश्वविद्यालय किंवा महाविद्यालयातील पूर्णवेळ विद्यार्थिनी असाव्यात. या विद्यार्थिनींचं वय 25 वर्षांहून कमी असावं. या तरुणी करेलिया क्षेत्रातील रहिवासी असाव्यात.
तरुणींची गर्भधारणा आणि त्यांच्या प्रसूतीनंतर बाळ सुदृढ असेल तरच ही रक्कम त्यांना दिली जाणार आहे. दुर्दैवानं बाळ मृत असल्यास मात्र ही रक्कम मिळणार नाही. बाळ जन्मत:च दिव्यांग असल्यास या बक्षीसपात्र रकमेचं काय? यासंदर्भात मात्र अटीशर्थींमध्ये कोणतीही बाब नमूद नाही.
अधिकृत आकडेवारीनुसार 2024 मध्ये रशियात पहिल्या सहामाईमध्ये अवघ्या 5,99,600 बालकांचा जन्म झाला. मागील 25 वर्षांमधील ही सर्वात कमी आकडेवारी असून, 2023 च्या तुलनेच हा आकडा 16000 नं कमी आहे. ही बाब देशाच्या भविष्यासाठी विनाशकारी असल्याचं वक्तव्य क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी केलं. गेल्या काही वर्षांमध्ये वाढता मृत्यूदर, सातत्यानं कमी होणारा जन्मदर या रशियापुढं असणाऱ्या अतिशय गंभीर समस्या असल्याचं म्हटलं जात असून, युक्रेनसोबत सुरू असणारं युद्ध, नागरिकांनी परदेशाची वाट धरणं या साऱ्यामुळं ही स्थिती आणखी गंभीर होतना दिसत असतानाच आता त्यावर तोडगा म्हणून रशियामध्ये नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत.