नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आता आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात येताना आढळत आहेत. एम्स ट्रोमा सेंटरमध्ये तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ASI असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांमधील हे तिसरे जवान आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
ASI असलेले हे पोलीस कर्मचारी ट्रॉमा सेंटरमधील पोलीस चौकीत तैनात होते. आता या कर्मचाऱ्याच्या कॉन्टेक्टमध्ये आलेल्या इतर पोलिसांची लिस्ट तयार करण्यात येत आहे. आता सफदरजंग पोलीस ठाण्यातील 30 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये कोविड-19चे आतापर्यंत 1069 प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी 25 रुग्ण बरे झाले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाचे 8447 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 765 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 273 लोकांचा मृत्यू झाला आहे.