नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकारने ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, या नव्या ५०० रुपयांच्या नोटांसाठी किती रुपये खर्च झाले हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकूण किती रुपये सरकारने यासाठी खर्च केले आहेत.
नोटबंदीनंतर ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी सरकारने ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकारने लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी एका लेखी उत्तरात म्हटलं की, ५०० रुपयांच्या एकूण १,६९५.७ कोटी नव्या नोटा ८ डिसेंबरपर्यंत छापण्यात आल्या.
यापूर्वी सरकारने मार्च महिन्यात सांगितलं होतं की, ५०० रुपये आणि २००० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी २.८७ रुपये ते ३.७७ रुपये खर्च लागला. मात्र, त्यावेळी सरकारने जुन्या नोटांना नव्या नोटांसोबत बदलण्यासाठी एकूण किती खर्च आला यासंदर्भात सांगितलं नव्हतं.
५०० रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी ४,९६८.८४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. आरबीआयने २००० रुपयांच्या ३६५.४ कोटी नोटा प्रिंट केल्या आहेत आणि त्यासाठी १,२९३.६ कोटी रुपेय खर्च आल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे २०० रुपयांच्या १७८ कोटी नोटांची छपाई करण्यासाठी ५२२.८३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. ५०, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा या नव्या डिझाईनमध्ये छापण्यात आल्या आहेत.