लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री योगो आदित्यनाथ यांना 'आवाज' दिलाय. या निवडणुकीनंतर ते माजी मुख्यमंत्री असतील असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ३९ जागा लढवीत आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आणि अन्य नेते उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेत.
डुमरियागंज विधानसभा मतदार संघात उमदेवार राजू श्रीवास्तव यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि योगीसरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी "उत्तर प्रदेश की शान, तीर कमान, तीर कमान" ही घोषणा देत कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
२०१७ मध्ये आम्ही उत्तर प्रदेशमध्ये विकासाची गंगा वाहणार आहे, असे ऐकत होतो. केंद्रात ३०३ चे बहुमत मिळाले. इथेही बहुमत मिळाले. पण, कसले बहुमत आहे? कुणी राजाच्या हाती सत्ता मिळाल्यानंतर त्याने जनतेचा विकास करायचा असतो. पण, त्या निवडणुकीत जी स्वप्ने लोकांना दाखविण्यात आली तसा विकास झाला का? ती स्वप्ने फक्त स्वप्नेच बनून राहिली. स्वप्नांचा जुमला झाला पण स्वप्ने पूर्ण झाली नाही, असा टोला लगावतानाच तर मग परिवर्तन व्हायला हवं की नको, असा थेट सवाल केला.
सिर्फ नफरत की बाते हुई, सिर्फ दंगे कि बाते हुई
युपी सरकारची पाच आणि केंद्र सरकारची सात वर्ष झाली. तरीही अजून लोकांना घाबरविण्याचे काम भाजप करत आहे. असं होईल, तसं होईल. हे संकटात आहे, ते संकटात आहे. इथे कुणी संकटात सापडू शकत नाही. कारण ही भूमी रामाची जन्मभूमी आहे. ही आपली भूमी आहे. हा आपला देश आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी, "जेव्हा राजकारण कराल तर ते समाजासाठी करा. समाजसेवेसाठी करा. राजकारण करू नका. जेव्हा सत्ता येईल. तेव्हा सगळ्यांना अधिकार मिळावा असे राजकारण करा हेच सांगितले.
लाज वाटते की त्या सरकारमध्ये आम्ही होतो
शासन धर्मासाठी नव्हे तर लोकांसाठी असावे. कुणाचीही जात, धर्म काहीही असो. पण, सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो. महाराष्ट्र्रात ३/४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. शेतकरी बांधव मुंबईत येत होते. मोर्चा येत होता. त्यावेळी भाजप सरकार होते. आम्हीही त्या सरकारमध्ये सामील होतो. त्या सरकारमध्ये आम्ही सामील होतो याची आम्हाला लाज वाटते. त्यावेळी चुका झालाय. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे असे ते म्हणाले.
त्या शेतकऱ्यांच्या झेंड्याचा रंग लाल होता. म्हणून त्यावेळी त्यांना दहशतवादी, देशद्रोही, माओवादी, उग्रवादी म्हटले गेले. त्याचीच पुनरावृत्ती इथे झाली. लखीमखेमपुरी विसरलात का? ती घटना अजूनही मनात आहे. त्याच्या जखमा अजूनही इथे आहेत असे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचा विकास कोणती असे सांगितले जात होते. पण, विकास झाला का? नाही झाला. इथले मुख्यमंत्री मुबंईत येतात तिथे जाहिरात देतात. इतके उद्योग आले. कारखाने आले. मग, इथे रोजगार वाढला का? नाही. उलट बेरोजगारी वाढलीय. महिला अत्याचार वाढलेत की महिला सन्मान वाढलाय? सामाजिक न्याय वाढलाय की सामाजिक अन्याय वाढलाय? असे सवाल उपस्थित करत आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.