दिल्ली जिंकल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी धरला 'रिंकिया के पापा'वर ठेका

आप कार्यकर्त्यांचा जल्लोष...

Updated: Feb 11, 2020, 08:00 PM IST
दिल्ली जिंकल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी धरला 'रिंकिया के पापा'वर ठेका  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीत 'आप'ने चांगलीच बाजी मारली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच 'आप' आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार, 'आप' ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने ८ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणूकीत एकही जागा मिळवता आलेली नाही. सकाळपासूनच आघाडीवर असलेल्या 'आप'ने दुपारनंतर बहुमताच्या आकड्याकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 'आप'च्या कार्यालयात एकच जल्लोष सुरु झाला होता. 'आप' कार्यकर्ते गाण्यांवर थिरकतानाही दिसले. पण यावेळी गाण्यांवर थिकरताना 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते आणि अभिनेते मनोज तिवारी यांच्या गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

एकीकडे 'आप'च्या कार्यालयामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयात भयाण शांतता पाहायला मिळाली. 'आप'च्या कार्यकर्त्यांनी मनोज तिवारी यांच्या 'रिंकीयाके पापा' या गाण्यावर केलेला डान्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी 'आप'ची सत्ता येईल, असं सांगणाऱ्या एक्झिट पोल्सचे दावे फेटाळून लावले होते. ११ फेब्रुवारीला सर्व एक्झिट पोल्स खोटे ठरतील. भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल. तुम्ही माझे ट्विट सेव्ह करून ठेवा, असं तिवारी यांनी म्हटलं होतं.  

दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर आता मनोज तिवारी यांचं ट्विटही चांगलंच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून त्यावर अनेक मीम्स तयार करुन ते व्हायरल होत आहेत.