MP Suspended For Entire Monsoon Session: आम आदमी पार्टीचे एकमेवर लोकसभा खासदार सुशील कुमार रिंकू यांना गुरुवारी संसदेच्या उर्वरित पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयक गुरुवारी लोकसभेमध्ये आवाजी मतदाने मंजूर करण्यात आल्यानंतर सुशील कुमार रिंकू संसदेच्या वेलमध्ये (अध्यक्षांसमोरील रिकामा भाग) आले आणि त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्लांच्या दिशेनं कागद भिरकावले. या कृतीनंतर सुशील कुमार रिंकू यांना निलंबित केलं. मागील आठवड्यामध्ये मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालणारे राज्यसभेतील आपचे खासदार संजय सिंह यांना राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळेच सुशील कुमार रिंकू यांच्या माध्यमातून संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित झालेले आपचे दुसरे खासदार ठरले आहेत.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयक आवाजी मतदानाने संमत झाल्याने विरोधी पक्षातील अनेक खासदार सदनाबाहेर जाऊ लागले. हे विधेयक जेव्हा राज्यसभेमध्ये सादर करण्यात येणार हे निश्चित झालं. त्यावेळेस सुशील कुमार रिंकू हे वेलमध्ये आले आणि त्यांनी कागद फाडून ओम बिर्लांच्या दिशेने भिरकावले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समोर बसलेले असतानाच हा सारा प्रकार घडला. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुशील कुमार रिंकू यांना संसदेच्या उर्वरित पावसाळी सत्रामधून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपला निर्णय देण्याआधी सभागृहाकडून परवानगी मागितली. त्यावर एकच गोंधळ झाला आणि अध्यक्षांनी आवाजी मतदानाच्या आधारे सुशील कुमार रिंकू यांना निलंबित केलं.
निलंबनाच्या कारवाईनंतर आपचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी, जेव्हा निवडून दिलेल्या सरकारचे अधिकार हे निवडून न आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती दिली जाते तेव्हा तो संविधानाचा अपमान असतो, अशी प्रतिक्रिया नोंदवली. कोण भ्रष्ट आहे आणि कोण नाही हे न्यायालय ठरवेल. मला या गोष्टीचं जराही वाईठ वाटत नाही की मी लोकांसाठी आवाज उठवल्याने आणि लोकशाहीची रक्षा केल्याने माझं निलंबन झालं, असंही सुशील कुमार रिंकू म्हणाले.
नक्की वाचा >> मी कोणत्या टीममध्ये? लोकसभेत अमित शाहांना ओवैसींचा प्रश्न; शाह म्हणाले, 'माझी इच्छा तर...'
सुशील कुमार रिंकू हे पंजाबमधील जालंधरचे खासदार आहेत. आपच्या आधी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसने निलंबित केलं. त्यानंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश घेतला. 10 मे रोजी जालंदरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून ते खासदार झाले. त्यांनी संसदेचं अधिवेशन सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 20 जुलै रोजी खासदारकीची शपथ घेतली आहे. त्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात त्यांचं अधिवेशनापुरतं निलंबन झालं आहे.