एक वाघ अन् शेकडो गावकरी; नेमकं नियंत्रित कोणाला करायचं? VIDEO तुफान व्हायरल

लखनऊच्या पिलीभीत येथे वाघाने गावकऱ्यांची झोप उडवली आहे. रात्री गावात घुसलेला वाघ एका भिंतीवर जाऊन बसला. कित्येक तास वाघाने तिथेच बस्तान मांडलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 26, 2023, 12:57 PM IST
एक वाघ अन् शेकडो गावकरी; नेमकं नियंत्रित कोणाला करायचं? VIDEO तुफान व्हायरल title=

उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे रात्री उशिरा एक वाघ जंगलातून बाहेर पडत थेट रहिवासी भागात घुसला. जेव्हा लोकांनी वाघाला पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वाघ एका भितींवर जाऊन बसला आणि तिथे बस्तानच मांडलं. गावात वाघ शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोक त्याला पाहण्यासाठी जमा झाले. वाघ तेथून हलण्यास नकार देत असल्याने अख्खं गाव रात्रभर जागं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल व्हिडीओत वाघ भिंतीवर आराम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी वाघाला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. पण यावेळी वाघाच्या चारी बाजूने जाळ्या लावण्यात आल्या होत्या. जेणेकरुन वाघाने हल्ला केला तर त्याला लोकांमध्ये जाण्यापासून अडवता येईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पिलीभीतच्या कलीनगर तालुका क्षेत्राच्या अटकोनामधील आहे. येथे रात्री दीड ते 2 वाजण्याच्या सुमारास वाघ दिसला. भटके कुत्रे वारंवार भूंकत असल्याने गावकरी पाहण्यासाठी आले असता त्यांनी वाघाला पाहिलं. यानंतर एकच खळबळ उडाली होती. गावातील काही सजग नागरिकांनी तात्काळ वनविभागाला कळवलं. यानंतर वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसर सील केला. 

वाघ जवळपास 7 ते 8 तास त्याच भिंतीवर आराम करत असून, फिरत आहे. तो कधीतरी त्या भिंतीवर झोपत आहे, तर कधीतरी तिथे शतपावली करत आहे. पहाट होताच शेकडो लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर काहीजण घराच्या छतांवरुन वाघाचा व्हिडीओ शूट करताना दिसले. यावेळी पोलीस कर्मचारीही तिथे उपस्थित होते. 

वनविभागाचं पथक वाघाला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात आहे. वाघाने अद्याप कोणावरही हल्ला केलेला नाही, पण जर लोकांची गर्दी पाहून त्याला असुरक्षित वाटलं तर तो हल्ला करण्याची भीती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाच्या दुर्लक्षपणामुळेच वाघ गावात शिरल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान वाघ गावात शिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. पिलीभीतमधील गावांमध्ये नेहमीच वाघ भेटी देत असतात. पण यामुळे गावकरी नेहमी दहशतीत असतात. 

पिलीभीत हे व्याघ्र प्रकल्पाचे ठिकाण असून जिल्ह्यात चार महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 2015 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून किमान चार डझन वाघांच्या हल्ल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.