दिल्लीमध्ये एका 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने तरुणाला आपल्या पत्नीसह घरात एकत्र पाहिलं होतं. आरोपी घरी पोहोचला तेव्हा पत्नी तरुणासह आक्षेपार्ह स्थितीत होती. रितीक वर्मा असं पीडित तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
"सोमवारी सकाळी 11 वाजता पती घरी पोहोचला होता. यावेळी त्याने पत्नीला एका दुसऱ्या तरुणासह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर त्याचा पारा चढला. त्याने पत्नी आणि तरुण रितीक वर्मा यांना बेदम मारहाण केली," अशी माहिती पोलिस उपायुक्त (ईशान्य) राकेश पावेरिया यांनी दिली आहे.
पीडित तरुणाच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रितीकला अत्यंत बेदम मारहाण केली होती. "त्याने रितीकची नखही उपटून काढली. अत्यंत वाईट प्रकारे त्याचा छळ करण्यात आला. त्याचा शरिरावरील प्रत्येक भागावर जखम होती," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रितीक आणि पत्नी दोघांचाही छळ केला. रितीकला एकापेक्षा जास्त व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली आहे. रितीक हा टेम्पो ड्रायव्हर आणि घऱातील एकमेव कमावता होता असंही त्यांनी सांगितलं आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले होते. यावेळी नातेवाईकांनी रितीकला रुग्णालयात नेलं असल्याचं त्यांना समजलं. पीडित तरुणावर उपचार केले जात असतानाच रात्री 9 वाजता मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.