राजधानी दिल्लीत 30 वर्षीय पित्याने आपल्याच सात वर्षीय सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी आदल्या दिवशीच जेलमधून सुटून बाहेर आला होता. 7 वर्षीय चिमुरडीला जमिनीवर आपटून त्याने निर्दयीपणे ठार केलं. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस शुक्रवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मुलगी बेशुद्धावस्थेत त्यांना आढळली. मुलीला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण नंतर तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या आईने, आरती यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपी विजय साहनीविरुद्ध आयपीसी कलम 302 (हत्या) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आरती यांनी तक्रारीत सांगितलं आहे की, विजय हा आपला पहिला पती असून त्याला दोनवेळा अटक झाली आहे. तो जेलमध्ये शिक्षा भोगत होता. विजय जेलमध्ये असताना आपण त्याचा भाऊ दीपकसह लग्न केलं. त्याच्यापासून आपल्याला अमंतिका नावाची मुलगी झाली.
आरोपी बुधवारी जेलमधून सुटला होता. यानंतर त्याने पूर्वाश्रमीच्या पत्नीचं घर गाठलं आणि संतापाच्या भरात मुलीला ठार केलं असं पोलिसांनी सांगितलं आहे. आरतीच्या सांगण्यानुसार, विजय आणि तिचं 7 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आहे, जो 5 वर्षांचा आहे. विजयला दारु विकताना पकडण्यात आलं होतं. तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 15 ते 20 दिवसांपूर्वी त्याची सुटका करण्यात आली. चार वर्षांपूर्वी सोनसाखळी चोरी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आणि तो जेलमध्ये होता.
"जेलमधून सुटल्यानंतर माझा पूर्वाश्रमीचा पती गुरुवारी रात्री 10 वाजता घऱी पोहोचला होता. घऱी पोहोचताच त्याने माझ्याकडे एकत्र राहणार का अशी विचारणा केली. मी नकार दिला असता त्याने मला मुलीला ठार करण्याची धमकी दिली. त्याला दारुचं व्यसन असून, चुकीच्या कामात सहभागी असतो. त्याने झोपेत असणाऱ्या माझ्या मुलीला उचललं आणि जमिनीवर आपटलं. यानंतर मुलगी बेशुद्ध पडली होती," असं आरतीने सांगितलं आहे. यानंतर आरती यांनी तात्काळ दीपक आणि शेजारच्यांना बोलावलं. त्यांनी मुलीला घेऊन रुग्णालयात धाव घेतली.
डॉक्टरांनी मुलीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात पाठवलं. परंतु नंतर, पोलिसांनी बाळाला नारायण रुग्णालयात नेले, जिथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. शवविच्छेदन करून तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.