भोपाळ : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना मध्य प्रदेशातील ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यानच्या व्हिडिओने सर्वांचच लक्ष वेधलं. मध्य प्रदेशच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील एका महिला मंत्रीमहोदयांनी असं काही केलं, जे पाहता सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ अवघ्या काही क्षणांमध्ये व्हायरल झाला. ज्यामुळे मंत्रीमहोदया इमरती देवी काहीशा गोंधळलेल्याही दिसल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या भाषणामध्ये प्रमुख पाहुणे हे अनेकदा उपस्थितांना संबोधित करतात. पण, मध्य प्रदेशच्या महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांना मात्र हे काही जमलेलं नाही. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून हे लक्षात येत आहे. या व्हिडिओमध्ये इमरती देवी या भाषणासाठी उभं राहिल्या असतानाच काही क्षणांनी त्या व्यासपीठावर असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना भाषण पुढे नेण्याची विनंती केली. हा सर्व प्रकार पाहता उपस्थितांमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या.
ग्वाल्हेर जिल्हा मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. ज्यानंतर इमरती देवी यांनी झाल्या प्रकरणाबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'गेल्या दोन दिवसांपासून माझी तब्येत ठिक नव्हती. तुम्ही हवं तर डॉक्टरांनाही याविषयी विचारू शकता', असं म्हणत झाल्या प्रकरणावर फार काही न बोलता जिल्हाधिकाऱ्यांनी भाषणाचं वाचन चांगल्या पद्धतीने केल्याचंही त्यांनी म्हटलं.
Madhya Pradesh Minister Imarti Devi: I was sick for the past two days, you can ask the doctor. But it is okay. the collector read it (the speech) properly. pic.twitter.com/JDQGI9WDuR
— ANI (@ANI) January 26, 2019
मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या सरकारच्या २८ मंत्र्यांमध्ये फक्त दोन महिला मंत्र्यांचा समावेश असून, इमरती देवी हे त्यातीलच एक नाव. डबरा या भागाचं त्या प्रतिनिधीत्वं करतात. त्या चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतरही त्यांच्या एका वक्तव्याने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. ज्योतिरादित्य सिंधिया यांना फक्त नेताच नव्हे तर मी त्यांची पूजा करते, असं वक्तव्यं त्यांनी केलं होतं.