'कोरोनामुक्त' झालेल्या या राज्यात पुन्हा सापडले नवे रुग्ण

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

Updated: May 14, 2020, 08:08 PM IST
'कोरोनामुक्त' झालेल्या या राज्यात पुन्हा सापडले नवे रुग्ण title=

पणजी : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या गोव्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहे. गोव्यामध्ये ७ नवे रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १४वर गेली आहे. गोव्यामध्ये सापडलेले ७ नवे रुग्ण हे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत. 

गोव्यात सापडलेल्या ७ नव्या रुग्णांपैकी ५ जण एकाच कुटुंबातले आहेत. हे कुटुंब सोलापूर जिल्ह्यातून गोव्याला परतलं होतं. देशभरात लॉकडाऊन सुरू होण्याआधी हे कुटुंब सोलापूरला गेलं होतं. या ५ जणांमध्ये नवरा, बायको त्यांचा मुलगा, सून आणि नात यांचा समावेश आहे. कुटुंबातली नात ही गोव्यातली आत्तापर्यंत सापडलेली सगळ्यात लहान कोरोनाची रुग्ण आहे. ७ पैकी उरलेले २ जण ट्रक ड्रायव्हर आहेत. यातला एक ट्रक ड्रायव्हर मुंबईवरून तर दुसरा गुजरातवरून आला आहे. 

७ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचा शोध घेणं सुरू असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेले सगळे जण बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत. एकाच कुटुंबातल्या ५ जणांना लगेचच क्वारंटाईन करण्यात आलं आहे, तर ड्रायव्हरच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असल्याचं सावंत म्हणाले.

बुधवारआधी गोव्यामध्ये कोरोनाचा रुग्ण ३ एप्रिलला सापडला होता. यानंतर १७ एप्रिलला गोवा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलं. गोव्यामध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 

बुधवारी गोव्यामध्ये सरकारच्या बसने कर्नाटकच्या घाटप्रभामधून ६० विद्यार्थी, कोची आणि मंगळुरूमधून २६ जण, तर गुरुवारी बंगळुरूमधून २४ जण परत आले. मागच्या २ दिवसात १५ बसमधून एकूण २४१ जण गोव्यात परत आले. तर गोव्यात अडकलेले परराज्यातील ४,४७६ जण मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमधले होते. हे सगळे श्रमीक स्पेशल ट्रेनने त्यांच्या राज्यात परतले असल्याची माहिती गोव्याच्या राज्य सरकारने दिली आहे.