टेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण

धारावीतील एकूण रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे धारावीतील १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Apr 25, 2020, 06:23 PM IST
टेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण title=

मुंबई: धारावी परिसरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दररोज चढउतार पाहायला मिळत आहेत. कालच धारावीतील कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा कमी झाल्याने आरोग्य यंत्रणांना थोडीफार उसंत मिळणार , असे दिसत होते. मात्र, आज पुन्हा धारावीत कोरोना व्हायरसने उसळी घेतल्याचे चित्र आहे. धारावीत आज कोरोनाचे २१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे धारावीतील १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुण्यात लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढण्याची शक्यता- टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही धारावीसारख्या झोपडपट्टीच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. धारावीतील अनेक भाग सील करूनही या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. 

कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट या दोन शहरांमध्ये आहेत. मुंबईतील तब्बल आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर आहे. यापैकी प्रत्येक वॉर्डात कोरोनाचे २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ३ मे नंतरही मुंबईतील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांसाठी वाढवला जाण्याची शक्यता आहे.