Real Estate : एकिकडे जागतिक आर्थिक मंदीमुळं अनेक देशातील अर्थव्यवस्थांना हादरा बसलेला असताना आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला पुनरूज्जीवनाची गरज असतानाच भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील अर्थ व्यवस्थेत होणाऱ्या सकारात्मक बदलांचे परिणाम देशातील विविध शहरांमध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीवर होताना दिसत आहेत. यंदाच्या वर्षी पहिल्या त्रैमासिक अहवालानुसार देशात सध्याच्या घडीला दोन शहरांमध्ये मालमत्तेच्या दरात अतिशय वेगानं वाढ झाली आहे.
नाईट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स क्यू1 2024 च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्चदरम्यान मुंबई शहरामध्ये 11.5 टक्क्यांनी मालमत्तेचे दर वाढले असून, देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये हे दर साधारण 10.5 टक्क्यांनी वाढले असल्याचं सांगितलं जात आहे. थोडक्यात सध्याच्या घडीला मुंबई शहरात राहणाऱ्यांना य़ाचा फायदा होताना दिसत असून शहरातील नव्या घरांच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांना मात्र फटका बसताना दिसत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नोकरीच्या निमित्तानं स्थलांतरित होणाऱ्यांचा आकडा मोठा असून, त्या कारणानंसुद्धा या शहरांमध्ये घरांची मागणी सातत्यानं वाढताना दिसत आहे.
राहिला मुद्दा भारतातील मालमत्तेचे दर इतक्या मोठ्या फरकानं का वाढले, यासंदर्भातला तर जगभरातील सर्वाधिक महागडी संपत्ती असणाऱ्या शहरांच्या यादीत मनीला 26.2 टक्क्यांसह वार्षिक वाढीमुळं अग्रस्थानी राहिलं, त्यामागोमागच 12.5 टक्क्यांनी मालमत्ता दरात वाढ झालेलं टोक्ये शहर असल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला भारताचा जीडीपी 8 टक्के असून, त्यामुळंच देशातील घरांच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे निष्कर्ष आहेत.
2024 च्या पहिल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार जगभरातील 44 शहरांमध्ये मालमत्तेचे दर 4.1 टक्क्यांनी वाढले असून, 2022 नंतर ही सर्वाधिक मोठ्या फरकाची आकडेवारी म्हटली जात आहे. मागणीत वाढ झाल्या कारणानं मालमत्तेचे दर वाढले असून, त्या तुलनेत वितरण मर्यादित असल्यामुळं घरांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.