दिलासादायक बातमी, कोरोना आटोक्यात आणण्यात देशपातळीवर बऱ्यापैकी यश

लॉकडाऊनला एक महिना होऊन गेला आहे. त्यातच देशवासियांसाठी आता एक दिलासादायक बातमी.  

Updated: Apr 25, 2020, 03:04 PM IST
दिलासादायक बातमी, कोरोना आटोक्यात आणण्यात देशपातळीवर बऱ्यापैकी यश title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : लॉकडाऊनला एक महिना होऊन गेला आहे. त्यातच देशवासियांसाठी आता एक दिलासादायक बातमी. कोरोनाला आटोक्यात आणण्यात देशपातळीवर बऱ्यापैकी यश आलंय. विशेष म्हणजे देशातल्या ८० जिल्ह्यात मागच्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही नवा रूग्ण सापडला नाही. तर १५ जिल्ह्यात मागच्या २८ दिवसांत कोरोनाचा नवा रूग्ण आढळलेला नाही. जिल्हापातळीवर सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर चांगले परिणाम हाती येत आहेत. 

लॉकडाऊनमुळे संसर्गाचं प्रमाण कमी झालंय. कोरोनातून मुक्त केलेल्या रूग्णांचा रिकवरी रेट २०.५७ टक्के झाला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांचा दृष्टीकोन बदलल्याचं स्पष्ट झालंय. कोरोनाला हरवण्याबाबत ग्रामीण भागातही चांगली काळजी घेतली जात आहे. 

कोरोनासंबंधित असलेल्या लाखो नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्विलांस रिस्पाॅन्स टीमची स्थापना करण्यात आलीय. आईटी तज्ज्ञाच्या मदतीने प्रत्येक जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर डेटा गोळा केला जात आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक घऱात जाऊन सँम्पल घेतलं जात आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपआपल्या स्तरावर कोरोनाला हरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतंय. इतर देशांच्या तुलनेत भारतानं चांगली कामगिरी केल्याचं प्रशस्तीपत्रही जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे.