नवी दिल्ली : 'ब्लू व्हेल' गेमचा प्रभाव अजूनही कमी झालेला दिसत नाही. चंदीगडजवळील पंचकुला येथे १७ वर्षाच्या मुलाने गळफास लागून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण 'ब्लू व्हेल' गेम असल्याचे म्हटले जात आहे. १० वीत शिकणाऱ्या या मुलाने घरीच गळफास लावून घेतला.
पंचकुला येथील पोलीस उपायुक्त मनबीर सिंह यांनी सांगितले की, मुलाच्या आईवडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या डायरीत काही नोट्स आणि चित्र आढळले आहेत. त्यावरून मुलगा ब्लू व्हेल गेमचे आव्हान पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात चौकशी केली जाईल, असे पोलीस उपायुक्त मनबीर सिंह म्हणाले.
'ब्लू व्हेल' गेममुळे अनेक निष्पाप मुलांचे बळी गेले आहेत. यामधील आव्हानं जीवघेणी असतात. 'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेमची सुरुवात रूस मधून झाली. यात सहभागी झालेल्या स्पर्धकांना कागदावर आणि त्यानंतर शरीरावर ब्लू व्हेल बनवण्याचा टास्क दिला जातो. त्यानंतर अधिक भयंकर टास्क एकट्याने पूर्ण करण्यास सांगितले जाते. मोबाईल फोन आणि लॅपटॉपवरून खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये ५० दिवस वेगवेगळे टास्क दिले जातात.
रोज हे टास्क पूर्ण झाल्यानंतर हातावर ब्लेडने कापून एक चिन्ह बनवावे लागते. ५० दिवसात हे निशाण पूर्ण होऊन व्हेलचा आकार तयार होतो. त्यानंतर शेवटचा टास्क पूर्ण केल्यावर आत्महत्या करण्यास सांगितले जाते.