Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान तसेच अती जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने घशाचा कॅन्सर होतो हे तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल किंवा याबद्दल वाचलं असेल. मात्र एका तरुण महिला डॉक्टरने घशाचा कॅन्सर होण्यासाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स अधिक घातक असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर डारिया सदोव्स्काया नावाच्या तरुणीचा व्हिडीओ अमेरिकेसहीत युरोपीयन देशांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये डॉ. सदोव्स्काया यांनी अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, ऑरोफरीन्जियल कॅन्सरच्या नावाने ओळखला जाणाऱ्या कॅन्सरचा धोका हा ओरल सेक्समुळे निर्माण होतो.
ओरल सेक्सदरम्यान मानवी शरीरामध्ये सामान्यपणे एचपीव्ही नावाने ओळखला जाणारा पॅपिलोमावायरस संक्रमित होतो. एचपीव्ही सर्वसामान्यपणे लैंगिक संबंधांमधून संक्रमित होणारा विषाणू आहे. दरवर्षी अमेरिकेमध्ये 1 कोटी 30 लाख लोकांना एचपीव्हीचा संसर्ग होतो असंही सांगण्यात आलं आहे.
डॉ. सदोव्स्काया यांनी "महिलांबरोबर ओरल सेक्स केल्याने पुरुषांना घशाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. यामागील कारण म्हणजे महिलांच्या गुप्तांगामध्ये एचपीव्ही विषाणू असण्याचा धोका अधिक असतो," असं आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. मानवी गुप्तांगांना होणाऱ्या संसर्गासाठी कारणीभूत असलेला एचपीव्ही विषाणू ओरल सेक्सदरम्यान तोंडावाटे घशात जातो आणि त्यामुळे थ्रोट कॅन्सर म्हणजेच घशाचा कर्करोग होऊ शकतो असं डॉ. सदोव्स्काया यांचं म्हणणं आहे. डॉ. सदोव्स्काया यांचे टिकटॉकवर 90 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
डॉ. सदोव्स्काया यांना त्यांच्या हजारो फॉलोअर्सपैकी अनेकांनी 'घशाचा कॅन्सर होण्यासाठी ओरल सेक्स हे सर्वात मोठं कारण आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का?' असा प्रश्न विचारला आहे. यावर डॉ. सदोव्स्काया यांनी, "आय सेड व्हॉट आय सेड" असं म्हटलं आहे. अमेरिकन चित्रपट अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लसने त्याला ओरल सेक्समुळे घशाचा कर्क रोग झाल्याचा दावा केला होता. मायकेल डग्लसला तू मोठ्या प्रमाणात मद्यपान तसेच धुम्रपान करतो याबद्दल तुला खेद वाटतो का? असं कॅन्सरचं निदान झाल्यानंतर 'द गार्डीयन'च्या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावेळेस मायकेल डग्लसने, "नाही असं काही नाही. फार माहिती न देता मी एवढं सांगू शकतो की मला झालेला कॅन्सर हा एचपीव्हीमुळे झाला आहे. हा संसर्ग महिलांबरोबर ओरल सेक्स केल्याने होतो," असं उत्तर दिलं होतं.
डॉ. सदोव्स्काया यांनी पुरुषांना ओरल सेक्स रिसिव्ह करताना कंडोम वापरा असा सल्ला दिला आहे. कंडोम वापरल्यास ओरल सेक्सच्या माध्यमातून होणारा एचपीव्हीचा धोका कमी होतो असं डॉ. सदोव्स्काया यांचं म्हणणं आहे. 'न्यू यॉर्क पोस्ट'नेही डॉ. सदोव्स्काया यांच्या व्हिडीओच्या आधारे वृत्त दिलं आहे.
ओरल सेक्सच्या माध्यमातून होणाऱ्या घशाचा कॅन्सरच्या लक्षणांबद्दल बोलताना डॉ. सदोव्स्काया यांनी एक छोटी यादीच सांगितली आहे. तोंडाला येणारी दुर्गंधी, घशात खवखव होणे, मान किंवा कान ठणकत राहणे, अन्न गिळण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसू शकतात असं डॉ. सदोव्स्काया यांचं म्हणणं आहे.