मुंबई : स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्टासमोर कोणाचही काही चालत नाही. लहान मुलांच्या हट्टापुढे प्रत्येक जण गुडघे टेकतोच. लहान मुलांची प्रत्येक इच्छा तुम्ही आम्ही पूर्ण करतोच. मुलं चॉकलेट्स, आईस्क्रीम, कोल्ड्रींक, ज्यूससाठी हट्ट करतात, आणि तुम्ही त्यांचा हट्ट पुरवता. पण नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात घालत आहात. कारण हे पदार्थ बनवण्यासाठी अशी साखर वापरली जातेय, ज्यामुळे वजन वाढणं, डिप्रेशन अशा समस्या वाढल्या आहेत. (white Sugar is bad impact on health of children)
आपल्या मुलांना आईस्क्रीम, चॉकलेट्स, ज्यूस सारख्या खाद्य पदार्थांपासून दूर ठेवणं तसं कठीणच असतं. पालकही मुलांना आवडीनं हे पदार्थ खाऊ घालतात. पण हेच पदार्थ तुमच्या मुलांचं आरोग्य बिघडवू शकतात. कारण त्यात मिसळलंय सफेद विष. म्हणजेच व्हाईट शुगर. साखरेमुळे पदार्थांमध्ये गोडवा येतो. मात्र हीच व्हाईट शुगर मुलांच्या दातांवर तसंच आरोग्यावर परिणाम करतेय.
दात किडण्याच्या प्रमाणात वाढ
कळत नकळत आपण विषारी पदार्थ खातोय हे या चिमुकल्यांच्या ध्यानीमनीही नसतं. मात्र या पदार्थांच्या सेवनानं मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.
स्वस्त साखर उठली चिमुकल्यांच्या जीवावर ?
रासायनिक प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या साखरेत कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मुलं शारीरिकदृष्या अशक्त बनत आहेत. साखरेचे जास्त पदार्थ खाल्यानं मुलांमधील तणावाचं प्रमाण वाढू लागलंय. जास्त साखरेमुळे वजन वाढीची समस्या बिकट होत चाललीय. मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम वाढू लागलाय.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार लहान मुलांच्या आहारात दिवसभरात जास्तीत जास्त 4 चमचे साखर असावी. शिवाय त्यांची पचनशक्ती मजबूत होण्यासाठी खेळ, व्यायामदेखील तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांच्या हट्टापायी त्यांचं आरोग्य धोक्यात घालू नका.