Sports Injuries: ​ खेळताना शरीराच्या कोणत्या भागाला असतो सर्वात जास्त धोका? त्यावर कसे करावेत उपचार

Sports Injuries: खेळात सर्वात जास्त होणाऱ्या दुखापती म्हणजे खांदा आणि गुडघ्याच्या दुखापती. कारण खांदा हा सांधा असला तरी तो अस्थिर असतो आणि  कुठलेही खेळ खेळताना गुडघ्यावर जास्त दाब येतो.

सुरभि जगदीश | Updated: Aug 19, 2023, 06:55 PM IST
Sports Injuries: ​ खेळताना शरीराच्या कोणत्या भागाला असतो सर्वात जास्त धोका? त्यावर कसे करावेत उपचार title=

Sports Injuries: एखाद्या खेळाडूला दुखापत झाली नसेल असं होणं अशक्य आहे. दररोज खेळणाऱ्या खेळाडूंना दुखापत ही होतच असते. कारण खेळ म्हणजे दुखापत आलीच. खेळाडू कितीही चांगला असला तरी दुखापत होतेच. कॉन्टॅक स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग, कबड्डी, रग्बी, रनिंग या दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. तर बास्केटबॉल, व्हॉलीबॉल अशा लिमिटेड क़ॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्येही दुखापत होते. तर नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट जसे गोल्फ, क्रिकेट, स्विमिंग यात दुखापत कमी होतात. 

खेळात सर्वात जास्त होणाऱ्या दुखापती म्हणजे खांदा आणि गुडघ्याच्या दुखापती. कारण खांदा हा सांधा असला तरी तो अस्थिर असतो आणि  कुठलेही खेळ खेळताना गुडघ्यावर जास्त दाब येतो.

गुडघ्याला दुखापत झाल्याची लक्षणे 

  • गुडघ्यात वेदना होणं 
  • गुडघ्याला सूज येणं 
  • गुडघा लाल होणं 
  • चालताना त्रास होणं
  • गुडघ्याची हालचाल कमी होणं
  • गुडघा अडकणं

गुडघ्याला दुखापत झाल्यास प्रथमोपचार काय द्यावेत?

पुण्यातील सिनियर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पराग संचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानी खेळ खेळताना दुखापत होते. त्यावेळी तात्काळ काय प्रथमोपचा द्यायला हवेत, असा प्रश्न अनेकदा येतो. त्यासाठी लक्षात ठेवा राईस (RICE).

  • R (Rest) - रेस्ट म्हणजे दुखापत झालेल्या खेळाडूने खेळ खेळणे थांबवणे आणि आराम करणे.
  • I (Ice)- आईस शेक घेणे म्हणजे जिथे दुखापत झाली तिथे बर्फ चोळणे.
  • I (Immobilise) - इममोबलाइझ म्हणजे गुडघ्याची हालचाल होणार नाही याची काळजी घ्या. तो ताण ठेवून त्याला कशाचा तरी आधार देऊन त्याला स्थिर करा. 
  • C (Compress) - त्यावर बँडेज लावून कॉम्प्रेशन द्याल.
  • E (Elevet) - पायाखाली उशी घेऊन किंवा टेबल वर पाय ठेवून पाय थोडा उंच राहिल याची काळजी घ्यावी. जेणेकरून सूज कमी होईल.

प्रथमोपचार हे तात्पुरते असतात. गुडघ्याची नेमकी दुखापत समजण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी त्यानंतर रुग्णाला रुग्णालयात न्यावे.

गुडघ्याला होणारी दुखापत आणि त्यावर कोणते उपचार करावेत याबाबत डॉ. संचेती यांनी माहिती दिलीये.

  • गुडघ्याला होणाऱ्या दुखापतीत गुडघ्याची उशी फाटणं, गुडघ्याच्या कार्टिलेजला हानी पोहोचणं, एसीएल या गुडघ्याच्या लिगामेन्टला हानी पोहोचणं इत्यादीचा समावेश आहे. 
  • एसीएलला हानी पोहोचली तर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. यावर आर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून पाहून शस्त्रक्रिया होते. फक्त एका टाक्याचे हे ऑपरेशन असते. दुर्बीण आत टाकून आणि दुखापत झालेल्या भागावर उपचार करतो. याला एसीएल रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. यानंतर रुग्ण एका दिवसात घरी जाऊ शकतो.
  • गादी फाटली असेल तर दुर्बिणीतून एका टाक्यात फाटलेली गाडी दुरूस्त केली जाते आणि यानंतरही रुग्ण लवकरात लवकर घरी जाऊ शकतो.
  • ऑपरेशन झाल्यावर महत्त्वाचं असते ते रिहॅबिलिटेशन. तज्ज्ञाच्या देखरेखीत फिजिओथेरेपी दिली जाते. आम्ही घरी फिजिओथेरेपीस्ट पाठवतो आणि ही थेरेपी देतो.
  • दुखापत टाळता येते. यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. खेळ खेळताना नी कॅप घालणं, डोक्याला दुखापत होण्याची शक्यता असेल तर हेल्मेट घालणे अशी स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी. ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी होईल आणि झालीच तर त्यावर उपचार करून ती बरी करता येते आणि पुन्हा पहिल्यासारखे खेळता येते. दुखापत होण्याआधी जो फिटनेस होता तोच उपचाराच्या पाच-सहा महिन्यांनी परत मिळवता येतो.