लखनऊ : पोटदुखीच्या त्रासामुळे एका अल्पवयीन मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्रास अधिक होत असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर जे समोर आलं त्यामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत. या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी 2 किलोचा केसांचा गोळा बाहेर काढला आहे.
17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे सुमारे दोन किलो वजनाचा केसांचा गोळा काढण्यात आला. लखनऊच्या बलरामपूर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने गुरुवारी ही शस्त्रक्रिया केली. बलरामपूर जिल्ह्यातील मुलीला ओटीपोटात दुखणं आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनद्वारे प्राथमिक निदान करण्यात आलं. यावेळी मुलीच्या ओटीपोटात गोळा असल्याचं दिसून आलं. यानंतर, शल्यचिकित्सकांच्या टीमचं नेतृत्व करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, "एन्डोस्कोपी केली आणि केसांचा एक गोळा पाहिला. हे केस काढून टाकण्यास रुग्ण नकार देत होती. पण खूप समजवल्यानंतर तिने ऑपरेशनसाठी होकार दिला. ती गेल्या पाच वर्षांपासून तिचे केस खात असल्याचं तिने सांगितलं."
ट्रायकोबेझोअर नावाचा हा दुर्मिळ डिसॉर्डर असतो. मानसिक स्थिती अस्थिर असली की व्यक्ती केस ओढण्यावर आणि खाण्यावर लक्ष केंद्रीत करते. या प्रकरणाच दोन किलो वजनाचे आणि 20x15 सेमी आकाराचा केसांचा गोळा काढण्यासाठी दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, रुग्णाला समुपदेशनाची गरज आहे.