मुंबई : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशातील एकूण 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. तर आता संपूर्ण देशभरात संपूर्ण देशभरात ओमायक्रॉमन रूग्णांची संख्या 422 वर जाऊन पोहोचली आहे.
422 पैकी 108 ओमायक्रॉनची प्रकरणं ही एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर गुजरात आणि तेलंगणामध्ये रुग्ण आढळून आले आहेत.
त्याचसोबत आंध्र प्रदेशात ओमायक्रॉनची आणखी दोन प्रकरणं समोर आली आहेत. यासह राज्यात एकूण 6 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. इथल्या प्रकाशम जिल्ह्यातील एक 48 वर्षीय पुरुष 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हैदराबाद आणि नंतर ओंगोलमध्ये आला होता. 19 डिसेंबर रोजी त्याचे नमुने घेण्यात आले आणि 20 डिसेंबर रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
या व्यक्तीचे नमुने CCMB, हैदराबादमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते आणि 25 डिसेंबर रोजी त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. याशिवाय ब्रिटनमधून आलेल्या एका 51 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आलं.
दरम्यान कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. हे बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्याचंही जाहीर केलंय. त्याचप्रमाणे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आजार आहे ते देखील 10 जानेवारीपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार Precaution डोस घेऊ शकणार आहेत.