High Cholesterol Levels: भारतात लाईफस्टाईल संबंधित आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये हृदयासंबंधीचे आजारांचं प्रमाण अधिक दिसून येतं. हृदयासंबंधीचे आजार वाढण्याचं कारण म्हणजे शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल. इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, भारतात 15 टक्के तरूणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका अधिक असल्याचं पहायाला मिळालंय. जे जगभरातील सरासरी 5 ते 10% पेक्षा खूप जास्त आहे.
इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. शिवाय या रिपोर्टनुसार, भारतामध्ये हृदयविकाराची प्रकरणं जगाच्या तुलनेत दशकभरापूर्वी येतायत. म्हणजेच जगाभरात हृदयविकार असलेल्याचं सरासरी वय 62 वर्षे आहे, तर भारतात ते 52 वर्षे आहे. कारण हे आजार लहान वयात आनुवंशिकतेमुळे होत असतात.
समोर आलेल्या या अहवालानुसार, भारतीयांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये लिपोप्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. 25 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये हे प्रमाणापेक्षा जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जागतिक स्तरावर ही सरासरी 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. लिपोप्रोटीनची उच्च पातळी हायपरकोलेस्टेरोलेमियाचा अनुवांशिक धोका दर्शवते.
अलीकडेच, लिपिड प्रोफाइलबाबत प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, 81% भारतीयांचे लिपिड प्रोफाइल खराब आहे. 67% भारतीय कमी एचडीएल कोलेस्ट्रॉल (चांगले कोलेस्ट्रॉल) आणि उच्च ट्रायग्लिसराइड्सशी झुंजत असल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.