केरळ : देशात कोरोनाचं संकट असताना आता निपाह व्हायरसने डोकं वर काढलं आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये निपाह व्हायरसने एकाचा बळी गेला आहे. निपाह व्हायरसची लागण झाल्याने केरळमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
या 12 वर्षांच्या मुलाला कोझिकोड इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या मुलामध्ये निपाह विषाणू संसर्गाची लक्षणं दिसून येत होती. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान एनआयव्ही पुणेने याबाबत पुष्टी केली आहे की, केरळमधून घेतलेल्या नमुन्याचा अहवाल निपाह पॉझिटिव्ह आला आहे. आज सकाळी मुलाचा मृत्यू झाला, त्याची प्रकृती आधीच गंभीर होती.
निपाह व्हायरसच्या संसर्गावर मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर एक टीम तयार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. याचसोबत विशेष अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
निपाहने बळी गेलेल्या मुलाला प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. मात्र पुन्हा त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, घाबरण्याची गरज नाही पण खबरदारी घेणं आवश्यक आहे. सध्या, मुलाच्या कुटुंबातील आणि इतर नातेवाईकांपैकी कोणालाही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची एक टीम पाठवली आहे, जी आज केरळला पोहोचेल. मंत्रालयाने सांगितलं आहे की, ही टीम राज्याला तांत्रिक सहाय्य करेल.