मुंबई : दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात. यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल.
पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते.
कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. असे नियमित केल्यास लवकरच परिणाम दिसू लागेल.
खोबरेल तेलात लिंबाचा रस घाला. त्याने डोक्याला हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतील.
कांद्यात सल्फर असते ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. यामुळे २,३ कांदे कापून त्याचा रस काढा आणि केसांना लावा. यामुळे केस काळे होतील आणि केसगळती थांबेल. मात्र हा उपाय नियमित करणे आवश्यक आहे.
पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते. चहा पावडर चांगल्या प्रकारे उकळवून घ्या आणि या पाण्याने केस धुवा. याचा परिणाम तुम्हाला हळूहळू दिसू लागेल.
आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करुन तेलात उकळवा. आवळ्याचा रंग काळा झाल्यानंतर या तेलाने केसांना मालिश करा. याशिवाय आवळ्याच्या पेस्टमध्ये लिंबाचे काही थेंब घाला.
कोरफड बहुगुणी असल्याचे आपण जाणतोच. त्वचेसोबतच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. केस धुण्यापूर्वी कोरफड जेल लावा आणि मसाज करा. त्यानंतर केस धुवा. केस काळे आणि दाट होतील.