दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. अशातच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेसंदर्भात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे पुढील तीन महिने फार महत्त्वाचे ठरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नीती आयोगाचे सदस्य तसंच लसीकरणासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के पॉल यांनी हा इशारा दिला आहे.
डॉ. पॉल म्हणाले, त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये राज्यांनी यासाठी पूर्णपणे तयार राहावं. त्याचप्रमाणे आगामी दोन महिन्यांत सणासुदीच्या काळात कोरोनासंबंधी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील पॉल यांनी केलं आहे.
डॉ. पॉल यांच्या सांगण्यानुसार, कोरोना महामारीची तिसरी लाट ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान येऊ शकते, असं सर्व अंदाजांमध्ये वर्तवण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. तर केरळमधील परिस्थितीही सुधारत आहे. पण तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आपण कोणतीही कमतरता ठेवू नये.
दरम्यान कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी येणाऱ्या सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. यासाठी कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं आणि नागरिकांना लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं डॉक्टर व्ही. के. पॉल म्हणाले.
सणवार अतिशय साधेपणानं साजरे केल्यास कोरोनाविरोधी लढाईत जिंकू शकू. लसीमुळे कोरोनापासून सुरक्षा मिळण्यास मदत होते. तसंच तिसऱ्या लाटेची गंभीरता कमी करण्यासाठी हे प्रभावी ठरू शकतं, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलंय.