गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक- ICMR

कोरोनाचा धोका हा गरोदर महिलांना अधिक असल्याचं समोर आलं आहे.

Updated: Sep 17, 2021, 08:05 AM IST
गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक- ICMR title=

मुंबई : कोरोनाचा संकट अजूनही टळलेला नाहीये. अशातच कोरोनाचा धोका हा गरोदर महिलांना अधिक असल्याचं समोर आलं आहे. इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात असं म्हटलंय की, कोरोना गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात संक्रमित करू शकतो. 

आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, यामुळे गरोदर महिलांना मध्यम ते गंभीर आजार होऊ शकतात. या अभ्यासात, अशा महिलांना तत्काळ वैद्यकीय सहाय्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. 

अभ्यासानुसार असं म्हटलं आहे की, इतर आजार जसे की अशक्तपणा, क्षयरोग आणि मधुमेह यामुळे कोरोना विषाणूची लागण झालेल्या गर्भवती आणि बाळंतपण करणाऱ्या स्त्रियांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो. महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोविड -19 चे निदान झालेल्या महिलांच्या क्लिनिकल वैशिष्ट्ये आणि गर्भधारणेच्या परिणामांचं विश्लेषण या अभ्यासात करण्यात आलं आहे.

हे विश्लेषण 'प्रिकोविड रजिस्ट्री'च्या डेटावर आधारित होतं, जे कोविड -19 पासून बरे झालेल्या गर्भवती महिला आणि प्रसूतीनंतर महिलांवर आधारित अभ्यास आहे. 'प्रीकोव्हिड रजिस्ट्री' अंतर्गत, महाराष्ट्रातील 19 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गर्भवती आणि प्रसूतीनंतर कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलांची माहिती गोळा केली गेली.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत (मार्च 2020-जानेवारी 2021) 4,203 गर्भवती महिलांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. अभ्यासात असं आढळून आलं की, 3213 बाळांचा जन्म झाला, तर गर्भपाताची 77 प्रकरणं नोंदवली गेली. 534 महिलांनी (13 टक्के) कोविड -19 रोगाची लक्षणं दर्शविली, त्यापैकी 382 स्त्रियांना (72 टक्के) सौम्य संसर्ग झाला, 112 स्त्रियांना (21 टक्के) मध्यम संसर्ग झाला तर 40 स्त्रियांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता.