हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी खास 'डाएट टीप्स'

शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते.

Updated: Jul 18, 2018, 04:43 PM IST
हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी खास 'डाएट टीप्स'  title=

मुंबई : शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. मासिकपाळीचा त्रास, प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यास स्त्रियांच्या शरीरात रक्ताची, आयर्नची कमतरता जाणवते. त्याचा परिणाम हिमोग्लोबिनच्या पातळीवरही होतो. अशावेळेस औषधोपचारासोबतच आहाराच्या पथ्यपाण्यामध्ये काही बदल केल्यास तुम्हाला हिमोग्लोबीन आणि रक्ताची पातळी वाढायला मदत होते. 

हिरव्या भाज्या 

पालक, मेथी, शतावरीचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबीनचं प्रमाण सुधारायला मदत होते. या पदार्थांमध्ये आयर्न घटक मुबलक असतात. सिमला मिरची, ब्रोकोली, कोबी, टोमेटो यांचाही समावेश वाढवा. 

डाळी - 

बारली, तांदूळ, रवा, बाजरी, मका यांचा आहारात समावेश केल्यानेही हिमोग्लोबीनची पातळी सुधारायला मदत होते. सोबतच मूग डाळ, मसूर, उडीद, छोले, राजमा यांमधील आयर्न घटक, फॉलिक अ‍ॅसिड लाल रक्तपेशींना वाढवण्यास मदत करतात. 

मांसाहार - 

शाकाहारी पदार्थांसोबत मासे, मीट, मांस अशा मांसाहारी पदार्थांचा आहारात समावेश वाढवल्यानेही हिमोग्लोबीनचं प्रमाण सुधारण्यास मदत होते. 

सुकामेवा 

बदाम, अंजीर, मनुका अशा सुकामेव्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. यामध्ये मुबलक आयर्न घटक असतात. 

व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ 

आहारात केवळ आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे पुरेसे नाही. आहारातील आयर्न घटक रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे. याकरिता किवी, पपई, संत्र, स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू अशा पदार्थांचा मुबलक समावेश करणं आवश्यक आहे. 

फॉलिक अ‍ॅसिड 

पुरेशा लाल रक्त पेशी नसल्याने हिमोग्लोबीन पातळी कमी असल्यास आहारात काही बदल करणं फायदेशीर ठरतं. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं मदत करते. 

मसाल्याचे पदार्थ 

मसाल्यातील काही सुके पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास आयर्नचं रक्तामध्ये शोषण होण्यास मदत होते. याकरिता कोथिंबीर, चवळी सोबत तुळस, तेजपत्ता देखील मदत करते.