पटना : देशात, जगभरात तंत्रज्ञान, विज्ञान अतिशय पुढे गेले आहे. दररोज काहीतरी नव-नवीन संशोधनकरून शोध लावले जात आहेत. वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे आपल्या आरोग्यासाठीही त्याचा चांगला उपयोग करता येत आहे. अशाचप्रकारे विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करत बिहारच्या पटना येथील हर्षिल आनंद आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून एका खास टी-शर्टची निर्मिती केली आहे. हे टी-शर्ट अनेक लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हर्षिलने तयार केलेलं स्मार्ट टी-शर्ट खासकरून वयोवृद्ध लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
पटनाच्या आशियाना येथे राहणाऱ्या १७ वर्षीय हर्षिल आनंदने लावलेला शोध अनेकांसाठी वरदान ठरणार आहे. हर्षिद आणि त्याच्या तीन मित्रांनी एका खास टी-शर्टची निर्मिती केली असून त्याला 'स्मार्टी स्मार्टी' असे नाव देण्यात आले आहे. या टी-शर्टला खास वयोवृद्धांसाठी बनवण्यात आले आहे. जी मुले घरापासून दुर राहतात आणि आपल्या आई-वडिलांची नियमित आरोग्य तपासणी करु शकत नाही असे लोक या टी-शर्टच्या माध्यमातून त्यांच्या पालकांच्या आरोग्याची माहिती घेऊ शकतात.
'स्मार्टी' टी-शर्टमध्ये एक चीप लावण्यात आली आहे. जी संपूर्ण डेटा क्लाउड सर्वरच्या माध्यमातून दर पाच सेकंदांनी अपलोड करत असते. 'स्मार्टी' टी-शर्ट शरीरातील रक्तदाब, स्ट्रेस लेवल, ईसीजी, हृद्याचे ठोके याचा संपूर्ण डेटा कलेक्ट करते. त्याशिवाय या टी-शर्टमध्ये एक पॅनिक बटन देण्यात आले आहे. जे आपत्कालीन परिस्थितीत अॅपचा वापर करत संबंधित व्यक्तीला फोनद्वारे सूचना पाठवू शकते.
ज्यावेळी रुग्णाने स्मार्ट टी-शर्ट घातलेले असेल त्यावेळी रुग्णाच्या संबंधित व्यक्तीला मोबाईल अॅपच्या माध्यमातून रुग्णाची संपूर्ण माहिती रक्तदाब, स्ट्रेस लेवल आणि नाडीचे ठोके याबाबत माहिती पोहचवली जाते. आपल्या कुटुंबियांच्या तब्येतीची ऑनलाईन माहिती कधीही आणि कुठेही स्मार्टी टी-शर्टच्या माध्यमातून मिळू शकते. येत्या काही महिन्यांमध्ये हर्षिलला स्मार्ट टी-शर्टचे पेटेंट मिळणार आहेत. हर्षिलचे तीन मित्र राजस्थानमधील रोहित दयानी, नालंदामधील रंजन आणि झारखंडचा त्रिशित हे तिघेही यामध्ये काम करत असून ते एका स्टार्टअपमध्येही काम करत आहेत.
हर्षित विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. २०१७ साली त्याला आपत्ती व्यवस्थापन दरम्यान वापरल्या जाणाऱ्या ड्रोनसाठीही पुरस्कार मिळाला आहे. स्मार्टी टी-शर्ट एक अनोखा प्रयोग असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर घरापासून दूर राहणाऱ्या लाखो लोकांना त्यांच्या पालकांच्या तब्येतीबाबत सहज माहिती मिळू शकणार आहे.