मुंबई : आजकाल लहान मुलांच्या आहारात पोषक पदार्थांचा अभाव निर्माण झाला आहे. एकूणच तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पालकही रेडी टू ईट किंवा जंकफूडचा पर्याय सहज निवडतात. यामुळे नकळत वाढत्या वयात मुलांच्या शरीरात संतुलित आहाराचा अभाव असल्याने काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. म्हणूनच लहान मुलांच्या आहारात या पदार्थांचा समावेश टाळण्याचा सल्ला हिरानंदानी हॉस्पिटल, वाशीच्या प्रमुख क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, स्वाती भूषण, यांनी दिला आहे.
१) जंकफूड व फ्राईड खाद्यपदार्थ :
फ्रेंच फ्राईज, समोसा, वडे इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात मेद असते. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा व हृदयविषयक आजार होण्याचा धोका निर्माण होतो. जंक फूड हे बाहेरील खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात आलेले एक नाव आहे. या जंक फूडमध्ये अल्प प्रमाणात पौष्टिक मूल्ये असतात किंवा जवळपास नसतातच. जंक खाद्यपदार्थांमध्ये अधिक प्रमाणात मेद, रिफाइन केलेले पीठ, साखर व सोडिअम असते. वारंवार जंक खाद्यपदार्थांचे सेवन करणा-या मुलांना पौष्टिक खाद्यपदार्थ आवडतच नाहीत. त्यांना जंक खाद्यपदार्थच अधिक आवडू लागतात. विविध प्रकाराच्या भाज्या, धान्ये, डाळी, फळे व मसाल्यांचा वापर करत पौष्टिक मूल्य साधता येऊ शकते. पण अशा प्रकाराचा आहार तयार करताना त्यामध्ये कमी प्रमाणात मेद असणे आणि योग्य प्रमाणात पौष्टिक मूल्ये असणे महत्त्वाचे आहे. तीळाचे तेल व ऑलिव्ह तेल यांसारख्या अल्प प्रमाणात मेद असलेल्या आरोग्यदायी तेलांचा वापर करा आणि लोणी व तूप यांसारख्या अधिक प्रमाणात मेद असलेल्या पदार्थांचा कमी प्रमाणात वापर करा.
२) सोडा :
सोड्यामधून कोणत्याच कॅलरी व पौष्टिक मूल्ये मिळत नाहीत. सोड्यामध्ये नेहमीच्या प्रमाणापेक्षा अधिक साखर असते. डायट सोडा तर घातकच आहे. अधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने काही तासांसाठी रोगप्रतिकार शक्ती कमी होते. या काळात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. साखरेच्या वारंवार सेवनाने मुलाची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. तसेच सोड्यामध्ये असलेले फॉस्फॉरिक आम्ल शरीरातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअम सारख्या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण कमी करते. दूध व दही आणि त्यांच्यापासून विना साखरेसह तयार कलेले ताक, फ्रुट मिल्कशेक्स व स्मूथीज हे शीतपेयांसाठी आरोग्यदायी पेये आहेत. या पेयांमध्ये प्रथिने, कॅल्शिअम व जीवनसत्त्व ब असते आणि ते आतड्यांसाठी चांगले देखील असतात.
३) लाल मांस :
लाल मांसामध्ये काही पौष्टिक मूल्ये असली तरी यामध्ये मेद (घातक मेद) अधिक प्रमाणात असते. यामुळे शरीरातील जळजळ वाढण्याचा धोका असतो. यामधील विशिष्ट प्रकाराच्या शर्करेमुळे जळजळ वाढू शकते. जळजळ तीव्र झाली तर कर्करोगग्रस्त गाठ येण्याचा धोका वाढतो. लाल मांसासाठी चिकन, मासे व अंडी हे पर्याय आहेत, पण त्यांचे देखील माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे.
४) प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ :
मूलभूत पौष्टिक मूल्यांचा अभाव, घातक रसायनांचा समावेश असलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या अधिक प्रमाणात सेवनाने हळूहळू रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. पालकांनी अधिक जबाबदारीने आपल्या मुलांना दलिया (लाप्सी), ओट्स, क्विनाओ, नाचणी इत्यादींसारख्या आरोग्यदायी पदार्थांचे पोषण दिले पाहिजे. यामुळे मुलांमधील आजाराचे प्रमाण कमी होईल आणि त्यांचे आरोग्य सुधारेल.
५) रिफाइन केलेले धान्य :
व्हाइट ब्रेड, व्हाइट पास्ता, पाव, बन्स असे पदार्थ रिफाइन केलेल्या पीठापासून (मैदा) तयार केले जातात. यामध्ये महत्त्वाच्या पौष्टिक मूल्यांचा, विशेषत: व्हिट-बँड फायबरचा अभाव असतो. हे पदार्थ तयार करताना सर्व फायबर निघून जाते आणि फक्त स्टार्च आणि काही प्रमाणात पौष्टिक मूल्ये राहतात. या पदार्थांच्या सेवनामुळे वजन वाढण्यासोबतच बद्धकोष्ठतेचा देखील त्रास होतो. अशा प्रकाराच्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा आणि गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली, नाचणी, ओट्स, मका, ब्राऊन राइस इत्यादींसारख्या धान्यांचा वापर करा.
६) साखर :
साखरेमुळे मुलांच्या कमरेचा घेर वाढू शकतो आणि तात्पुरत्या काळासाठी रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. फूड लेबल्सवर साखरेची विविध नावे आहेत, जसे डेक्स्ट्रोज, मेल्टोज, फ्रूटोज, लॅक्टोज, कॉर्न सिरप आणि अशा नावांमुळेच आपण फसतो. कॅनमधील फ्रूट ज्यूसेसमध्ये इतर घटकांसह साखरेचे देखील प्रमाण असते आणि निश्चितच अशा पेयांमध्ये फळांचे प्रमाण कमीच असते. कॅनमधील फूड व शर्करायुक्त स्नॅक्सचे सेवन कमी करणेच उत्तम. त्यापेक्षा फळांचा नैसर्गिकरित्या आस्वाद घ्या.